Stock Market Updates Sensex settles 442 points higher
विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी आणि बँकिंग शेअर्समधील तेजीच्या जोरावर सोमवारी (दि.२१ जुलै) सेन्सेक्स- निफ्टी वधारुन बंद झाले. सेन्सेक्स ४४२ अंकांनी वाढून ८२,२०० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२२ अंकांनी वाढून २५,०९० वर बंद झाला. एकूणच शेअर बाजारात खरेदीचा उत्साह राहिला.
विशेषतः बँकिंग शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी बँक मजबूत दिसून आला. निफ्टी बँक १.१ टक्के वाढला. यावर आयसीआयसीआय बँक २.७ टक्के, एचडीएफसी बँक २.२ टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक १.३ टक्के आणि कोटक बँक शेअर्स १.१ टक्के वाढला.
मेटल, रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. पण आयटी शेअर्सवर दबाव राहिला. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के वाढून बंद झाला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ७.३ टक्के वाढून टॉप गेनर राहिला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एम अँड एम, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक बँक, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एलटी, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २.७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे रिलायन्सचा शेअर्स ३.२ टक्क्यांनी घसरला. एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, आयटीसी, मारुती आदी शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
सेन्सेक्स सुरुवातीला १४८ अंकांनी घसरून ८१,६०० पर्यंत खाली आला होता. तर निफ्टी २५ हजारांच्या खाली गेला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी जोरदार रिकव्हरी केली. ICICI बँक आणि HDFC बँकेच्या जून तिमाहीतील चांगल्या कमाईच्या आकडेवारीने एकूणच बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये तेजीचा माहौल राहिला. समभागांमध्ये वाढ दिसून आली.
तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३७४.७४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. या खरेदीमुळे बाजारातील भावना उंचावल्याचे दिसून आले.