Stock Market Today
शेअर बाजारात मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ३७० अंकांनी वाढून ८१,६४४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०३ अंकांनी वाढून २४,९८० वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल सारख्या हेवीवेट शेअर्समधील तेजीचा बाजाराला आधार मिळाला. संभाव्य जीएसटी सुधारणांबद्दलचा आशावाद आणि रशिया-युक्रेन यांच्यातील शांतता चर्चा पुढे जात असल्याची चिन्हे आदी घटकांमुळे बाजारातील भावनांना उंचावल्या. मुख्यतः ऑटो सेक्टरमध्ये बंपर खेरदी दिसून आली.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के वाढले. रिलायन्स, इटरनल, टेक महिंद्रा, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्हचा शेअर्स १ टक्के घसरला. पॉवर ग्रिड, एम अँड एम, एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी बँक, एलटी आदी शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी ऑटो १.३ टक्के वाढला. सरकारने छोट्या कारवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे ऑटो कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. तसेच आईल अँड गॅस निर्देशांक १.६ टक्के वाढला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स आज २.८ टक्के वाढला. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीला मदत मिळाली.
मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजाराला उभारी मिळाली. कच्च्या तेलाच्या दरातील घसरण हेदेखील बाजारासाठी सकारात्मक संकेत राहिले. मंगळवारी ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर ०.५० टक्के घसरून प्रति बॅरल ६६.२४ डॉलरवर आला.