Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला. सकाळी GIFT Nifty मध्ये घसरण दिसत असतानाही देशांतर्गत बाजारात खरेदीचा जोर कायम राहिला. बाजार उघडताच सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, तर निफ्टी 24,000 च्या पातळीच्या जवळ पोहोचला. बँक निफ्टीतही 140 अंकांची वाढ झाली.
विशेष म्हणजे, आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात IT आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे बाजारातील वातावरण काहीसे सकारात्मक दिसून आले.
आज सकाळच्या सत्रात IT इंडेक्स तब्बल 2.5 टक्क्यांनी वधारला. विशेषतः Wipro, Infosys, Coforge आणि Persistent Systems या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
Wipro च्या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. यामागे कंपनीने ServiceNow सोबतची भागीदारी वाढवल्याची घोषणा हे प्रमुख कारण मानले जात आहे.
AI आधारित Agentic Workflow साठी कराराचा विस्तार केल्यानंतर अमेरिकेत लिस्टेड Wipro च्या ADR मध्ये जवळपास 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याचाच परिणाम आज भारतीय बाजारातही दिसून आला.
Infosys च्या शेअरमध्ये 3.8 टक्क्यांची वाढ झाली, तर Coforge आणि Persistent Systems चे शेअर 3 टक्क्यांनी वाढले.
आज IT आणि बँकिंग शेअर्स तेजीत होते, पण FMCG, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये काहीशी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचा कल तंत्रज्ञान आणि फायनान्स क्षेत्राकडे वळल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळालं.
शुक्रवारी सकाळी GIFT Nifty जवळपास 100 अंकांनी घसरत 23,900 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यामुळे भारतीय बाजार घसरणीसह सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, देशांतर्गत बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. यामागे जागतिक बाजारातून आलेले काही सकारात्मक संकेत कारणीभूत मानले जात आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य युद्धविराम (Ceasefire) होण्याच्या चर्चेमुळे जागतिक बाजारात तणाव काहीसा कमी झाला आहे. काही हल्ल्यांनंतर दोन्ही देश 60 दिवसांच्या युद्धविरामावर सहमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
महागाई वाढूनही अमेरिकन बाजारांनी दमदार कामगिरी कायम ठेवली. डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि S&P 500 या प्रमुख निर्देशांकांनी नव्या उच्चांकांवर बंद होऊन जागतिक बाजारांना सकारात्मक संकेत दिले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. त्यांनी कॅश आणि फ्युचर्स मार्केट मिळून सुमारे 3,337 कोटी रुपयांची विक्री केली.
मात्र दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग आठव्या दिवशी खरेदी कायम ठेवत 3,821 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजारातील मोठी घसरण टळल्याचे दिसते.
आज बाजाराची नजर काही महत्त्वाच्या घडामोडींवर असेल. Asian Paints आणि InterGlobe Aviation यांच्या तिमाही निकालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्याचबरोबर Coal India च्या OFS, PB Fintech मधील संभाव्य ब्लॉक डील, आणि IMD चा दुसरा मान्सून अंदाज हे देखील बाजारासाठी महत्त्वाचे ट्रिगर ठरू शकतात.
जर मान्सूनचा अंदाज सकारात्मक आला, तर ग्रामीण मागणीशी संबंधित FMCG आणि कृषी क्षेत्रातील शेअर्समध्ये हालचाल दिसू शकते.