Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (Nifty) निर्देशांक 16 अंकांच्या वाढीसह 24,641 वर खुला झाला, तर मुंबई शेअर बाजाराचा (Sensex) निर्देशांक 201 अंकांच्या वाढीसह 78,782 वर उघडला. बाजारातील या सुरुवातीच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 40 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बुधवारी निफ्टी केवळ 10 अंकांच्या किरकोळ वाढीसह 24,625 वर बंद झाला होता. आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य (Market Capitalisation) वाढून 492.82 लाख कोटी रुपये झाले. दरम्यान, रुपयातही किरकोळ घसरण दिसून आली असून डॉलरच्या तुलनेत रुपया 95.13 या पातळीवर उघडला.
क्षेत्रनिहाय पाहता IT, मीडिया, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. मात्र ऑटो, FMCG आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम होता.
सेन्सेक्समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी 16 शेअर्स वाढीसह, तर 14 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे प्रमुख शेअर्स तेजीत होते, तर पॉवरग्रिड आणि ट्रेंट यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणसोबत लवकरच करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून ब्रेंट क्रूड 79.5 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे. कच्च्या तेलातील घसरण भारतासारख्या आयातदार देशासाठी सकारात्मक मानली जाते.
बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 943 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. त्याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 2,883 कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला चांगला आधार दिला.
बाजाराच्या दृष्टीने सध्या काही महत्त्वाचे सकारात्मक संकेत दिसत आहेत. ट्रम्प यांनी इराण कराराबाबत व्यक्त केलेला आशावाद, अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांकाची विक्रमी पातळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली खरेदी आणि रुपयामध्ये दिसणारी सुधारणा हे घटक बाजाराला आधार देत आहेत. तसेच जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारातील घसरणीमुळे भारतीय IT क्षेत्रातील शेअर्सना फायदा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दुसरीकडे, सलग सहा दिवसांच्या खरेदीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. इराण करार अंतिम टप्प्यात असला तरी दोन्ही बाजूंमध्ये अद्याप मतभेद कायम असल्याने अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे बाजार तेजीत राहणे काहीसे आव्हानात्मक ठरू शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, सध्याची बाजाररचना सकारात्मक आहे. निफ्टीसाठी 24,800 ही महत्त्वाची प्रतिकार (Resistance) पातळी असून 24,400 ते 24,300 हा मजबूत आधार (Support) मानला जात आहे.