Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; एका झटक्यात गुंतवणूकदारांना 1.3 लाख कोटींचा फायदा, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली असून, सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना काही क्षणांत सुमारे 1.3 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.

Rahul Shelke

Stock Market Today: रक्षाबंधनाच्या दिवशी आणि आठवड्याच्या अखेरच्या व्यवहार सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली असून, अवघ्या काही क्षणांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.3 लाख कोटी रुपयांची भर पडली.

शुक्रवारी बाजार उघडताच निफ्टी 32 अंकांनी वधारून 24,122 वर, तर सेन्सेक्स 194 अंकांच्या वाढीसह 77,128 वर उघडला. बाजारातील या सकारात्मक सुरुवातीमुळे BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 492.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

मात्र, मागील दोन सत्रांपासून सप्टेंबर सीरिजमध्ये बाजारावर दबाव दिसून येत आहे. या कालावधीत निफ्टी जवळपास 1 टक्क्यांनी घसरला आहे. गुरुवारी निफ्टी 116 अंकांच्या घसरणीसह 24,090 वर बंद झाला होता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही 24,000 ची पातळी बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी संमिश्र चित्र दिसून आले. जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे 0.8 टक्क्यांनी वधारला, तर दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक जवळपास 1 टक्क्यांनी घसरला.

दुसरीकडे, अमेरिकन शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी डाओ जोन्समध्ये 105 अंकांची वाढ झाली, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समुळे नॅस्डॅक 1.57 टक्क्यांनी वाढला. अमेरिकन बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावरही दिसून आला.

क्रूड ऑइलमध्ये पुन्हा तेजी; FII कडून मोठी विक्री

ईराण-अमेरिका संबंध आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील वाढत्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर क्रूड ऑइलमध्ये पुन्हा किरकोळ तेजी दिसून आली असून, त्याची किंमत 89 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे.

दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच FII ने गुरुवारी रोख बाजारात 298 कोटी रुपयांची विक्री केली. कॅश, इंडेक्स आणि फ्युचर्स या सर्व व्यवहारांचा एकत्रित विचार करता FII ची निव्वळ विक्री 3,884 कोटी रुपये इतकी झाली.

याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात DII ने सलग 13व्या दिवशी खरेदीचा जोर कायम ठेवला. गुरुवारी DII ने तब्बल 4,977 कोटी रुपयांची खरेदी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT