Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजारात जोरदार तेजी; गुंतवणूकदारांना 1.8 लाख कोटींचा फायदा

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली असून निफ्टी 83 अंकांनी, तर सेन्सेक्स 154 अंकांनी वधारला.

Rahul Shelke

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात अखेर तेजीचे संकेत दिसून आले आहेत. आज बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टीने 83 अंकांची वाढ नोंदवत 23,997 अंकांवर, तर सेन्सेक्सने 154 अंकांची वाढ घेत 76,724 अंकांवर व्यवहाराची सुरुवात केली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

बीएसईवर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 488.33 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे सलग तीन सत्रांपासून सुरू असलेल्या बाजारातील घसरणीला आज काहीसा ब्रेक मिळाल्याचे चित्र आहे.

रुपयालाही मोठी झेप

शेअर बाजारासोबतच भारतीय रुपयानेही आज दमदार सुरुवात केली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 67 पैशांनी मजबूत होऊन 94.30 वर खुला झाला. सध्याच्या पातळीवर रुपया जवळपास दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

याआधी बुधवारी निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली होती. निफ्टी 141 अंकांनी घसरून 23,914 वर बंद झाला होता. मात्र, आज जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजाराला सुरुवातीला आधार मिळाला.

आशियाई बाजारांमध्येही तेजी

जागतिक बाजाराचा विचार करता आशियातील प्रमुख बाजारांमध्येही सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. जपानच्या निक्केईमध्ये सुमारे पाव टक्क्यांची वाढ झाली, तर दक्षिण कोरियाच्या KOSPI निर्देशांकात दीड टक्क्यांची तेजी दिसून आली.

अमेरिकन शेअर बाजारातही तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी खरेदीचा जोर दिसून आला. त्याचा परिणाम भारतीय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावरही झाल्याचे दिसत आहे.

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी, कुठे दबाव?

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात फायनान्शियल, मेटल्स, मीडिया, पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. दुसरीकडे आयटी, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सवर काहीसा दबाव आहे.

सेन्सेक्समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी सुरुवातीच्या व्यवहारात 10 शेअर्स वधारले, तर 20 शेअर्स लाल रंगात दिसून आले.

यामध्ये अदानी पोर्ट्स, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि टाटा स्टील यांच्यात तेजी दिसत आहे. तर टेक महिंद्रा, HCL टेक, इन्फोसिस आणि TCS या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

FII-DII कडून खरेदीचा आधार

बाजारातील महत्त्वाच्या घटकांमध्ये परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदीही लक्षवेधी ठरत आहे. मागील सत्रातील घसरणीनंतरही FII ने कॅश मार्केटमध्ये 6,688 कोटी रुपयांची खरेदी केली. त्याचवेळी DII कडून 2,812 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली.

याशिवाय अमेरिका-इराण तणाव कायम असला तरी कच्च्या तेलाचे दर सध्या 95-96 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर आहेत. तीन दिवसांच्या घसरणीनंतर अमेरिकन बाजारातील खरेदी आणि आशियाई बाजारातील तेजी हे देखील भारतीय बाजारासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. बॉन्ड यील्डमध्ये झालेली घट हाही बाजारासाठी महत्त्वाचा सकारात्मक मॅक्रो घटक ठरत आहे.

निफ्टीसाठी 23,840 ची पातळी महत्त्वाची

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च ॲनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीचा RSI 38 पर्यंत खाली आला आहे. बाजार ओव्हरसोल्ड झोनच्या दिशेने गेल्याचे यातून संकेत मिळत असल्याने सध्याच्या पातळीवरून रिकव्हरीची शक्यता निर्माण झाली आहे.

निफ्टीसाठी 23,840 ही तातडीची सपोर्ट पातळी मानली जात आहे. त्याखाली 23,786 हा पुढील महत्त्वाचा सपोर्ट आहे. बाजाराने वरची वाट धरल्यास 24,020 ही पहिली अडथळ्याची पातळी, तर 24,150 हा पुढील महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो. मात्र, नजीकच्या काळात बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

हा फक्त बाउन्स बॅक की मोठी रिकव्हरी?

HDFC Securitiesचे टेक्निकल रिसर्च ॲनालिस्ट नागराज शेट्टी यांनी बाजाराच्या एकूण रचनेबाबत सावध भूमिका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, बाजाराचा ओव्हरऑल सेटअप अद्याप नकारात्मक आहे आणि सध्याच्या परिस्थितीत ‘Sell on Rise’ म्हणजेच तेजीमध्ये विक्रीची रणनीती पाहायला मिळू शकते.

त्यामुळे बाजारातील बाउन्स बॅक सहज होणार नाही, असे संकेत आहेत. निफ्टीसाठी 24,100 ते 24,200 हा पट्टा महत्त्वाचा ओव्हरहेड रेझिस्टन्स ठरू शकतो.

दुसरीकडे, निफ्टीने 23,800 चा सपोर्ट decisively तोडला, तर बाजार पुन्हा दबावाखाली येऊन 23,600 पर्यंत घसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली असली तरी ही तेजी टिकून राहते का, यासाठी 24,020-24,200 या रेझिस्टन्स झोनकडे आणि 23,800 च्या सपोर्टकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीची तेजी पाहून घाईने निर्णय घेण्याऐवजी बाजारातील पुढील दिशा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT