Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 25,700च्या वर स्थिर, आयटी शेअर्समध्ये घसरण

Stock Market Today: बुधवारी शेअर बाजाराने संमिश्र सुरुवात केली असून निफ्टी 25,700 च्या वर स्थिर राहिला, तर आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप–स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी कायम आहे.

Rahul Shelke

Stock Market Today: आज शेअर बाजाराने संमिश्र सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात बाजार कधी लाल तर कधी हिरव्या रंगात फिरताना दिसला. सकाळी साडेनऊच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 40 अंकांनी घसरून 83,400 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी जवळपास सपाट स्थितीत 25,720 च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही फारशी हालचाल दिसली नाही आणि निर्देशांक 61,160 च्या आसपास स्थिर राहिला.

मोठ्या निर्देशांकांमध्ये फारशी हालचाल नसली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र सकारात्मक वातावरण होते. दोन्ही निर्देशांकांत सुमारे अर्धा टक्का वाढ झाली. गुंतवणूकदारांची भीती दर्शवणारा इंडिया VIX निर्देशांकही सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरला, त्यामुळे बाजारातील तणाव काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.

आज मेटल शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसली. मेटल इंडेक्स जवळपास 1 टक्क्यांनी वधारला. याशिवाय पीएसयू बँका, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रातही तेजी पाहायला मिळाली. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), हिंदाल्को, टाटा स्टील, मॅक्स हेल्थकेअर आणि सिप्ला या शेअर्समध्ये खरेदीचा जोर होता.

मात्र, आयटी शेअर्समध्ये नफा-वसुलीचा दबाव स्पष्टपणे जाणवला. इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे निफ्टीत आघाडीचे घसरणारे शेअर्स ठरले. गेल्या काही दिवसांच्या तेजी नंतर गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्समध्ये नफा काढण्यास सुरुवात केल्याचे बाजार विश्लेषक सांगतात.

जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळाले. अमेरिकन बाजारात मंगळवारी मोठ्या चढ-उतारानंतर शेवटच्या सत्रात सुधारणा झाली. डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक दोन्ही निर्देशांकांनी दिवसाच्या नीचांकी पातळीवरून जोरदार रिकव्हरी केली. मात्र आज येणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिट्सपूर्वी डाऊ फ्युचर्समध्ये हलकी घसरण दिसत होती.

दरम्यान, कमोडिटी बाजारात मात्र दबाव कायम राहिला. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. देशांतर्गत बाजारात चांदी सुमारे 11 हजार रुपयांनी घसरून 2.29 लाख रुपयांच्या खाली आली, तर सोनेही 3 हजार रुपयांहून अधिक घसरून 1.51 लाख रुपयांच्या खाली बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने जवळपास 100 डॉलरने आणि चांदी सुमारे 5 टक्क्यांनी घसरली.

कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराबाबत चर्चा पुढे सरकत असल्याच्या बातम्यांमुळे ब्रेंट क्रूड जवळपास 2 टक्क्यांनी घसरून 67 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आले. तेलाच्या दरातील ही नरमाई ऑइल मार्केटिंग कंपन्या आणि विमान वाहतूक क्षेत्रासाठी दिलासादायक ठरू शकते.

बेस मेटल्समध्येही सर्वत्र घसरण दिसली. कॉपर सुमारे 2 टक्के घसरला, तर निकेलमध्येही दीड टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे येत्या सत्रांत मेटल शेअर्सवर काहीसा दबाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभागही मर्यादित राहिला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात खरेदी केली असली तरी एकूण व्यवहार पाहता हलकी विक्री दिसून आली. दुसरीकडे देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) सलग चौथ्या दिवशी किरकोळ खरेदी करत बाजाराला थोडासा आधार दिला. यावरून मोठे गुंतवणूकदार सध्या सावध असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीकडेही बाजाराचे लक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य पुढील दहा वर्षांसाठी वाढवण्यात आले असून 20 पेक्षा अधिक करार करण्यात आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT