Stock Market Today
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सुरुवातीच्या घसरणीतून जोरदार रिकव्हरी केली. सेन्सेक्स १,२०० अंकांनी वाढून (१.४ टक्के वाढ) वाढून ८२,५३० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३९५ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २५,०६२ वर पोहोचला. विशेष म्हणजे निफ्टीने ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच २५ हजारांची पातळी गाठली. फायनान्सियल, ऑटो आणि आयटी शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला घसरणीतून सावरून मोठी झेप घेण्यास पाठबळ मिळाले.
जागतिक संकेतांमध्ये सकारात्मक बदल आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य झिरो- टॅरिफ कराराच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. तसेच कच्च्या तेलाच्या दरातील घसरण, आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यता, परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ आदी घटकही बाजारातील तेजीमागे राहिले.
शेअर बाजारातील दमदार तेजीमुळे १५ मे रोजी बीएसई सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल ५.१० लाख कोटी रुपयांनी वाढून ४३९.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याआधीच्या सत्रात बाजार भांडवल ४३४.८९ लाख कोटी रुपयांवर होते.
सेन्सेक्सची सुरुवात आज ५०० अंकांच्या घसरणीसह झाली होती. त्यानंतर सेन्सेक्सने १,३८७ अंकांनी म्हणजेच १.७ टक्क्यांची वाढ नोंदवून ८२,७१८ या दिवसाच्या उच्चांकावर झेप घेतली. त्यानंतर तो १,२०० अंकांच्या वाढीसह ८२,५३० वर स्थिरावला.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स ४ टक्के वाढला. त्याचबरोबर एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, इर्टनल, मारुती, रिलायन्स, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, टेक महिंद्रा, टायटन, एम अँड एम, टाटा स्टील हे शेअर्स १ ते ३.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर सेन्सेक्सवरील ३० पैकी २९ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. तर एकमेव इंडसइंड बँकेचा शेअर्स लाल रंगात बंद झाला.
अमेरिका-इराण अणुकराराच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल होऊ शकतात, या शक्यतेने गुरुवारी तेलाच्या किमती सुमारे २ डॉलरने कमी झाल्या. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने महागाईबद्दलची चिंता कमी झाली आहे. तेलाच्या किमतीत घट होणे ही बाब भारतासाठी सकारात्मक मानले जाते.
व्याजदर कपातीची अपेक्षा
देशातील महागाईत घट झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या सत्रात रियल्टी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदीचा उत्साह राहिला. निफ्टी रियल्टी १.९ टक्के वाढला. तर निफ्टी मेटल निर्देशांक १.७ टक्के वाढून बंद झाला.
परदेशी गुंतणूकदारांचा खरेदीकडे कल
परदेशी तसेच देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदीदार पुढे आले आहेत. याचा बाजाराला आधार मिळाला आहे. एनएसईकडील आकडेवारीनुसार, १४ मे रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारात ९३१ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३१६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.