Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 43 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांना 40 हजार कोटींचा फटका

Stock Market Today: शेअर बाजारातील सुरुवातीच्या घसरणीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे 40 हजार कोटी रुपयांनी घसरले.

Rahul Shelke

Stock Market Today: मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 43 अंकांनी घसरून 24,175 वर उघडला, तर सेन्सेक्स 73 अंकांनी खाली येत 77,295 वर सुरू झाला. बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला आणि निफ्टी आणखी घसरून 24,150 च्या जवळ पोहोचला.

बाजाराच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सुमारे 40 हजार कोटी रुपयांनी घटले असून ते 491.30 लाख कोटी रुपयांवर आले.

सोमवारीही बाजारात घसरण झाली होती. निफ्टी 33 अंकांच्या घसरणीसह 24,219 वर बंद झाला होता. सध्या निफ्टी 24,000 ते 24,400 या महत्त्वाच्या पट्ट्यात व्यवहार करत आहे. या मर्यादेच्या वर किंवा खाली ब्रेकआऊट झाल्यास बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते.

जागतिक बाजारांचाही नकारात्मक परिणाम

जागतिक बाजारातील मिश्र वातावरणाचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला आहे. अमेरिकेतील चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे नॅस्डॅक सुमारे 200 अंकांनी घसरला. मात्र, डाऊ जोन्समध्ये सुमारे 140 अंकांची वाढ झाली.

चिप स्टॉक्समधील घसरणीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई सुमारे 0.3 टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा KOSPI जवळपास 2 टक्क्यांनी खाली आला.

कच्च्या तेलाच्या तेजीने बाजारावर दबाव

जियोजीत इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, सध्या बाजाराचे लक्ष इराणवरील अमेरिकेच्या नव्या निर्बंधांकडे लागले आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात काहीशी नरमाई आली असली तरी ते अजूनही 90 डॉलरच्या वर आहेत.

इराणी तेलपुरवठा आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील पुरवठ्याबाबतची अनिश्चितता यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांचा मूडही काहीसा बिघडला आहे.

याशिवाय, आरबीआयच्या कठोर धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाँड यिल्डमध्ये वाढ दिसत आहे. याचाही बाजारातील एकूण वातावरणावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

SAMCO Securities चे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, गेल्या काही सत्रांपासून बाजार एका ठराविक मर्यादेत व्यवहार करत आहे. निफ्टीसाठी 24,150 हा तातडीचा सपोर्ट मानला जात आहे. हा स्तर तुटल्यास निफ्टीला 24,100 वर पुढील सपोर्ट मिळू शकतो. दुसरीकडे, बाजारात तेजी परतल्यास 24,350 हा पहिला प्रतिकार स्तर असेल, तर 24,400 हा पुढील महत्त्वाचा प्रतिकार स्तर मानला जात आहे.

क्रूड ऑइल 92-93 डॉलरच्या आसपास

कच्च्या तेलाचे दर सध्या 92 ते 93 डॉलरच्या आसपास आहेत. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध जाहीर केल्यानंतर पुढील घडामोडींवर बाजाराचे लक्ष असेल.

सध्या क्रूड ऑइल सुमारे 92.5 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर व्यवहार करत आहे. तर नोव्हेंबर करारातील कच्च्या तेलाचे दर 90 डॉलरच्या खाली असल्याचे दिसत आहे.

परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी

बाजारातील चढ-उतारादरम्यान परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा कल दिसून आला. सोमवारी FII ने कॅश मार्केटमध्ये 1,182 कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच DII ने 2,493 कोटी रुपयांची खरेदी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT