Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात ‘रेड अलर्ट’! सेन्सेक्स निफ्टी घसरले; गुंतवणूकदारांसमोर मोठं संकट, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: शेअर बाजाराची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरणीसह सुरुवात झाली असून निफ्टी 14 अंकांनी घसरून 23,883 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ घसरणीसह झाली. निफ्टी 14 अंकांनी घसरून 23,883 अंकांवर, तर सेन्सेक्स 69 अंकांनी घसरून 76,446 अंकांवर उघडला. गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला होता. शुक्रवारी निफ्टी 24 अंकांनी वाढून 23,897 वर बंद झाला होता. त्यामुळे आज बाजाराची क्लोजिंग कोणत्या पातळीवर होते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

ऑटो, IT आणि FMCG शेअर्सवर दबाव

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो, IT, मीडिया, FMCG आणि रिअल्टी क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये घसरण दिसत आहे. दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल पाहायला मिळत आहे.

शेअर्समध्ये Eternal, Coal India आणि Bharti Airtel यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. तर Infosys, Tech Mahindra आणि Bajaj Auto यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून आला.

आशियाई बाजारात तेजी, अमेरिकन बाजार बंद

आशियाई बाजारांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे. जपानच्या Nikkei निर्देशांकात 1.75 टक्के, तर दक्षिण कोरियाच्या KOSPI मध्ये 3.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकन बाजार आज सुट्टीमुळे बंद राहणार आहे. मात्र, शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली होती.

कच्च्या तेलाच्या दरवाढीने वाढवली चिंता

गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची वाढ झाली असून क्रूड ऑइलचा भाव सध्या 97 डॉलरच्या आसपास आहे. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव हा तेलाच्या किमती वाढण्यामागील प्रमुख घटक मानला जात आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे याचा परिणाम महागाई आणि बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर होऊ शकतो.

FII ची मोठी विक्री, DII कडून जोरदार खरेदी

शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय कॅश मार्केटमध्ये 3,111 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) तब्बल 8,930 कोटी रुपयांची खरेदी केली.

DII कडून झालेली मोठी खरेदी बाजारासाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळणारा मजबूत आधार बाजारातील घसरण काही प्रमाणात रोखू शकतो.

निफ्टीसाठी 23,800 चा स्तर निर्णायक

भारतीय शेअर बाजारावर सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकेतील बॉन्ड यील्डचा दबाव आहे. मात्र, भारताची Q1FY27 मधील 7.8 टक्के GDP वाढ आणि मजबूत GST संकलनामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे.

तांत्रिक विश्लेषणानुसार 23,800 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे. हा स्तर टिकवण्यात बाजाराला अपयश आल्यास निफ्टी 23,600 पर्यंत घसरू शकतो.

दुसरीकडे, निफ्टीसाठी 24,000 ते 24,200 हा मजबूत रेजिस्टन्स झोन मानला जात आहे. या पातळीच्या वर टिकून राहिल्यास बाजारात पुन्हा तेजीचा प्रयत्न दिसू शकतो.

23,786 आणि 23,700 हे पुढील सपोर्ट

SAMCO Securities चे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, डेली चार्टवर सध्या बाजाराला स्पष्ट दिशा मिळालेली नाही. निफ्टी अजूनही Supertrend च्या खाली व्यवहार करत असल्याने तांत्रिकदृष्ट्या घसरणीचे संकेत कायम आहेत.

निफ्टीसाठी 23,786 हा पहिला महत्त्वाचा सपोर्ट, तर 23,700 हा पुढील सपोर्ट आहे. बाजारात रिकव्हरी झाल्यास 24,100 वर पहिला अडथळा येऊ शकतो. त्यानंतर 24,200 ही महत्त्वाची रेजिस्टन्स पातळी असेल.

निफ्टीचे महत्त्वाचे टेक्निकल लेव्हल्स

  • पहिला सपोर्ट: 23,786

  • दुसरा सपोर्ट: 23,700

  • महत्त्वाचा सपोर्ट: 23,800

  • पहिला रेजिस्टन्स: 24,100

  • मुख्य रेजिस्टन्स: 24,200

  • 23,800 च्या खाली गेल्यास: 23,600 पर्यंत घसरणीची शक्यता

एकूणच, जागतिक बाजारातील संकेत सकारात्मक असले तरी कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकेच्या व्याजदरांबाबतची अनिश्चितता भारतीय बाजारासाठी आव्हानात्मक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT