Stock Market Today: आठवड्याच्या चौथ्या व्यवहार सत्रात भारतीय शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात झाली. आज सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 15 अंकांनी वधारून 23,446 वर उघडला, तर सेंसेक्स 22 अंकांनी घसरून 74,742 वर उघडला. मात्र, बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये फारशी हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे बाजारात सध्या सावध आणि सुस्त वातावरण पाहायला मिळत आहे.
आज सेंसेक्सची वीकली एक्सपायरी असल्याने बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या तीन व्यवहार सत्रांपासून बाजारात सातत्याने घसरण होत आहे. बुधवारी निफ्टी 203 अंकांनी घसरून 23,431 वर बंद झाला होता, तर सेंसेक्समध्ये तब्बल 813 अंकांची घसरण होऊन तो 74,764 वर स्थिरावला.
HDFC Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नागराज शेट्टी यांच्या मते, निफ्टीच्या डेली चार्टवर मोठी ‘लाँग बेअर कँडल’ तयार झाली आहे. ही रचना बाजारातील आणखी घसरणीचे संकेत देत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात निफ्टीमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निफ्टीसाठी 23,070 हा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल मानला जात आहे. दुसरीकडे, बाजारात पुलबॅक झाल्यास 23,625 च्या आसपास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
निफ्टीने 26 जुलैचा 23,606 हा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल तोडला आहे.
निफ्टीचा RSI पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 26 च्या आसपास पोहोचला आहे.
उच्चांकापासून निफ्टीमध्ये जवळपास 1,000 अंकांची घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 101-102 डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत.
आज निफ्टी निगेटिव्ह पातळीवर बंद झाल्यास बाजारातील ब्रेकडाउन आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय शेअर बाजारासह जगभरातील बाजारांसमोर अमेरिका-इराणमधील वाढता तणाव हा मोठा धोका बनला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, क्रूड ऑइलचा भाव 102 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जगभरातील महागाईचा दबाव पुन्हा वाढण्याची भीती आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली जाऊ शकते. त्याचा परिणाम बॉन्ड यील्डवर होऊ शकतो. बॉन्ड यील्ड वाढल्यास इक्विटीसह विविध अॅसेट क्लासवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे बाजारातील चिंता आणखी वाढली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण मिडटर्म निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे. तसेच मिडटर्म निवडणुकीनंतर इराणसोबतचे युद्ध तातडीने संपण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
याचा अर्थ असा की, नोव्हेंबरपर्यंत क्रूड ऑइलच्या किमती उच्च पातळीवर राहण्याचा धोका कायम आहे. महाग क्रूड हे भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
इराणमधील संघर्ष लांबल्याने अमेरिकन बाजारांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकेतील महागाई वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत अनिश्चितता वाढली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील बॉन्ड यील्ड 4.8 टक्क्यांच्या पुढे गेला असून, तो 5 टक्क्यांच्या दिशेने गेल्यास अमेरिकन शेअर बाजारावर मोठा दबाव येऊ शकतो. अमेरिकन बाजारातील मोठ्या घसरणीचा थेट परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होण्याची शक्यता आहे.