Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 24,361 वर, गुंतवणूकदारांना एका झटक्यात 80 हजार कोटींचा फायदा

Stock Market Today: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 80 हजार कोटींची वाढ झाली.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 24,361 वर, तर सेन्सेक्स 70 अंकांच्या वाढीसह 77,998 वर उघडला. बाजारातील या तेजीमुळे व्यवहार सुरू होताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 80 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

BSE चे मार्केट कॅप 484 लाख कोटींवर

बाजारातील तेजीचा परिणाम मुंबई शेअर बाजारातील (BSE) लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यावरही दिसून आला. BSE वरील कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 484 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयानेही तेजी दाखवत 29 पैशांच्या वाढीसह 95.39 वर व्यवहार सुरू केला.

याआधी गुरुवारी निफ्टी 67 अंकांच्या वाढीसह 24,317 वर बंद झाला होता. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही बाजारातील सकारात्मक वातावरण कायम असल्याचे दिसून आले.

आशियाई बाजारातही जोरदार तेजी

भारतीय बाजाराला आशियाई बाजारांकडूनही चांगला पाठिंबा मिळत आहे. विशेषतः चिप (Semiconductor) कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे जपानचा निक्केई निर्देशांक 4.25 टक्क्यांनी, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1.4 टक्क्यांहून अधिक वाढला.

बाजारातील तेजीमागील प्रमुख कारणे

विश्लेषकांच्या मते, सध्या जागतिक पातळीवरील काही सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

  • अमेरिका आणि इराण यांच्यात नव्या संघर्षाचे कोणतेही संकेत नाहीत.

  • कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरून सुमारे 88 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आल्या आहेत.

  • अमेरिकन शेअर बाजारातही गुरुवारी जोरदार तेजी होती.

  • डॉलर निर्देशांक (Dollar Index) 100 च्या खाली घसरल्याने उदयोन्मुख बाजारांना आधार मिळत आहे.

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) पुन्हा भारतीय बाजारात सक्रिय झाले आहेत.

FII ची जोरदार खरेदी

गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात 3,625 कोटी रुपयांची खरेदी केली. त्याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 1,864 कोटी रुपयांची विक्री केली.

आज बाजारासाठी सकारात्मक घटक

  • FII कडून सलग तिसऱ्या दिवशी खरेदी

  • अमेरिकन बाजारातील तेजी

  • मध्यपूर्वेतील तणाव वाढलेला नसल्याने दिलासा

  • कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण

  • अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले

  • निफ्टीमध्ये ब्रेकआउटची शक्यता

गुंतवणूकदारांसाठी धोकेही कायम

तरीही काही जोखीम कायम आहेत.

  • देशांतर्गत फंडांकडून विक्रीचा दबाव

  • आयटी क्षेत्रावर जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम

  • निफ्टीचा PCR तुलनेने उच्च पातळीवर

  • वीकेंडपूर्वी नफा-वसुलीची शक्यता

निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी कोणती?

HDFC सिक्युरिटीजचे टेक्निकल रिसर्च विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, निफ्टीने तांत्रिक चार्टवर सकारात्मक कँडल तयार केली आहे. बाजारात सध्या कन्सोलिडेशन सुरू असून अल्पकालीन कल सकारात्मक आहे.

त्यांच्या मते, पुढील काही सत्रांमध्ये 24,300 ही पातळी मजबूत सपोर्ट म्हणून काम करू शकते. हा स्तर टिकून राहिल्यास निफ्टी 24,600 ते 24,700 या पातळीवर जाऊ शकतो.

सध्या जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची वाढती खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT