Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात मोठा ट्विस्ट! निफ्टी 23,150 वर उघडला, गुंतवणूकदारांचे तेलाच्या दरांकडे लक्ष

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सावध सुरुवात झाली. निफ्टी 23,150 वर, तर सेन्सेक्स 74,849 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सावध झाली. सकाळी निफ्टी 5 अंकांच्या वाढीसह 23,150 वर उघडला. तर सेन्सेक्स 120 अंकांनी वाढून 74,849 वर पोहोचला. मात्र, कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत वाढलेल्या चिंतेमुळे बाजारातील उत्साह मर्यादित राहिला. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 108 डॉलरच्या आसपास असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींकडे लागले आहे.

गेल्या आठवड्यात बाजारात चांगली वाढ

गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 2.8 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 23,146 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही जवळपास अर्ध्या टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली.

क्षेत्रनिहाय कामगिरी पाहिली तर एफएमसीजी आणि हेल्थकेअर वगळता बहुतांश क्षेत्रांच्या निर्देशांकांत वाढ झाली. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक म्हणजेच जवळपास 11 टक्क्यांची वाढ झाली. वाहन क्षेत्रात साडेतीन टक्के, तर रिअल्टी क्षेत्रात जवळपास 2.75 टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, हेल्थकेअर निर्देशांकात 1.1 टक्क्यांची घसरण झाली.

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, जागतिक बाजारातील दबाव कमी होणे आणि आयटी शेअर्समधील तेजी यामुळे निफ्टीने 23,000 चा टप्पा ओलांडला आहे.

निफ्टीसाठी 22,750 ते 22,800 हा महत्त्वाचा आधार मानला जात आहे. हा स्तर टिकला तर बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, निफ्टी या पातळीखाली घसरल्यास 22,460 हा पुढील आधार ठरू शकतो. वरच्या बाजूला 23,400 ते 23,440 या स्तरावर अडथळा आहे. हा टप्पा पार केल्यास निफ्टी 23,650 पर्यंत पोहोचू शकतो.

कच्च्या तेलाच्या दरांवर बाजाराची नजर

कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने दर 108 डॉलरच्या आसपास आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा युद्धापूर्वीच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. इराण आणि येमेनमधील हूतींचे हल्ले तसेच रशिया-युक्रेन युद्धातील वाढता तणाव यामुळे तेल बाजारावर दबाव आहे.

दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के आयातशुल्क लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो. आगामी काळात कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक घडामोडी यांचा भारतीय शेअर बाजाराच्या दिशेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT