Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी 109 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला असून निफ्टी 109 अंकांनी तर सेंसेक्स 356 अंकांनी खाली आला. IT, फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये तेजी दिसली.

Rahul Shelke

Stock Market Today: शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी घसरणीसह सुरुवात केली. सकाळी व्यवहार सुरू होताच प्रमुख निर्देशांक दबावाखाली दिसून आले. Nifty 109 अंकांनी घसरून 24,656 वर उघडला, तर BSE Sensex 356 अंकांनी घसरत 79,659 वर उघडला. गुरुवारी मात्र बाजारात जोरदार वाढ दिसली होती. काल निफ्टी 285 अंकांनी वाढत 24,765 वर बंद झाला होता.

चलन बाजारातही रुपयावर थोडासा दबाव दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 5 पैशांनी घसरुन 91.65 या पातळीवर उघडला. जागतिक घडामोडी, विशेषतः मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिकेच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळाले.

सेक्टोरल इंडेक्समध्ये मिश्र चित्र पाहायला मिळाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आणि आयटी निर्देशांकात सुमारे 1.5 टक्क्यांची वाढ झाली. आयटीसोबतच फार्मा, मीडिया आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. दुसरीकडे ऑटो, वित्तीय सेवा, पीएसयू बँक, रिअल्टी, एफएमसीजी आणि मेटल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी 50 मधील काही प्रमुख शेअर्समध्ये तेजी दिसून आली. Bharat Electronics Limited, HCLTech, Tech Mahindra, Tata Consultancy Services आणि Reliance Industries हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. या शेअर्समध्ये सुमारे 2 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.

याउलट काही मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाली. ICICI Bank, InterGlobe Aviation, Larsen & Toubro, HDFC Bank आणि Max Healthcare Institute या शेअर्समध्ये सुमारे 2.5 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

बाजारातील अस्थिरतेमागे जागतिक राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. गुरुवारी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार इराणचे परराष्ट्र मंत्री अटींसह अणु कार्यक्रम थांबवण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. या बातमीमुळे बाजारात काही प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे अनिश्चितता वाढली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, इराण युद्धाच्या परिस्थितीत चर्चेला तयार झाला असला तरी त्यांनी उशीर केला आहे. यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही प्रतिक्रिया देत अमेरिकेवर वारंवार करार मोडल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारतासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सवलत दिली आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील तणावामुळे निर्माण होणाऱ्या पुरवठा संकटाचा भारतावर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. याशिवाय भारताला तुलनेने कमी किमतीत तेल खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

एकूणच जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांची हालचाल यावर पुढील काही दिवस बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावधगिरी बाळगून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT