Stock Market Today: धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. मात्र, बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी शेअर्सची विक्री सुरू केली. त्यामुळे काही वेळातच निफ्टी 100 अंकांहून अधिक घसरला आणि 24,500 च्या खाली पोहोचला. गेल्या सहा सत्रांपासून सुरू असलेल्या बाजारातील तेजीला यामुळे काहीसा ब्रेक लागला आहे.
बाजारातील महत्त्वाचे अपडेट्स :
- सपाट सुरुवात : आज निफ्टी 2 अंकांच्या वाढीसह 24,538 वर उघडला. तर सेन्सेक्स 103 अंकांच्या वाढीसह 79,413 वर सुरू झाला.
- नफावसुलीचा दबाव : बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री सुरू केली. त्यामुळे निफ्टी 100 अंकांहून अधिक घसरून 24,500 च्या खाली गेला.
- सहा दिवसांत मोठी तेजी : भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा सत्रांपासून सातत्याने वाढ होत होती. या काळात निफ्टी तब्बल 1,838 अंकांनी वधारला. बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्यही 29 लाख कोटी रुपयांनी वाढले.
- अमेरिकी बाजारात मोठी घसरण : गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी पडझड झाली. डाऊ जोन्स 1,833 अंकांनी म्हणजेच 3.44 टक्क्यांनी घसरला. तर नॅस्डॅकमध्ये 5.52 टक्क्यांची घसरण झाली.
- एआय कंपन्यांच्या शेअर्सना फटका : आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे Nvidia, Broadcom, Micron आणि AMD यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. Microsoft, Meta आणि Oracle चे शेअर्सही सुमारे 7 टक्क्यांनी खाली आले.
- आशियाई बाजारातही पडझड : अमेरिकी बाजारातील घसरणीचा परिणाम जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारांवर झाला. या देशांमधील प्रमुख शेअर निर्देशांकांमध्ये 6 ते 7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
भारतीय शेअर बाजारासाठी कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी हे दोन महत्त्वाचे आधार आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढून प्रति बॅरल 99 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे तेलाच्या किमतींवर बाजाराची नजर असेल.
दुसरीकडे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तब्बल 14,975 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. ही एका दिवसातील मोठ्या खरेदीपैकी एक आहे. यापूर्वी 7 मे 2020 रोजी FIIs ने 19,056 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
SAMCO Securities चे तांत्रिक संशोधन विश्लेषक नील पारेख यांच्या मते, बाजाराचा एकूण कल अजूनही सकारात्मक आहे. त्यांच्या अंदाजानुसार, निफ्टी नजीकच्या काळात 23,910 ते 24,774 या मर्यादेत व्यवहार करू शकतो. 23,910 हा महत्त्वाचा आधारस्तर, तर 24,774 ही अडथळ्याची पातळी ठरू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.