Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आज (2 फेब्रुवारी) भारतीय शेअर बाजारात मोठ्या चढ-उतारांचे चित्र पाहायला मिळाले. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले, मात्र काही वेळातच बाजार सावरला.
सकाळी सुमारे 9.24 वाजता सेन्सेक्स 294 अंकांनी वाढून 81,017 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीही 24 अंकांनी वाढून 24,835 च्या आसपास पोहोचला. मात्र बँक निफ्टीत फारशी तेजी दिसली नाही. तो 17 अंकांनी घसरून 58,399 वर होता. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आजही विक्रीचा दबाव जाणवत होता.
शुक्रवारच्या क्लोजिंगच्या तुलनेत आज सेन्सेक्स 167 अंकांनी घसरत 80,555 वर उघडला होता. निफ्टीही 29 अंकांच्या घसरणीसह 24,796 वर सुरू झाला. बँक निफ्टी 178 अंकांनी खाली 58,239 वर उघडला. दरम्यान, चलन बाजारात रुपया 22 पैशांनी मजबूत होत डॉलरच्या तुलनेत 91.76 वर उघडला.
आज मेटल, पीएसयू बँक, खासगी बँका तसेच ऑयल अँड गॅस क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये सुरुवातीला थोडी तेजी होती, मात्र काही वेळातच ते पुन्हा लाल रंगात गेले.
इंडिया VIX म्हणजेच बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक सुरुवातीला 10 टक्क्यांहून अधिक घसरला होता, नंतर तो आणखी खाली आला. यामुळे बाजारातील भीती थोडी कमी झाल्याचे चित्र होते.
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत होते. GIFT निफ्टी सुमारे 50 अंकांनी घसरून 24,800 च्या आसपास दिसत होता. अमेरिकेतील डाओ फ्युचर्समध्येही घसरण होती. त्यामुळे बाजार सुरुवातीला मर्यादित रेंजमध्येच हालचाल करेल, असे संकेत होते.
जागतिक कमोडिटी बाजारात प्रचंड अस्थिरता दिसत आहे. चांदी आज सकाळी सुमारे 11 टक्क्यांनी वाढल्यानंतर पुन्हा खाली आली आणि सध्या ती फक्त 5 टक्के वाढीत आहे. सोन्याचे दरही आधी सुमारे 100 डॉलरने वाढले, पण नंतर ते 50 डॉलरने घसरले. याचा परिणाम कमोडिटीशी संबंधित शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराबाबत सकारात्मक चर्चा होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 67 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आले. मात्र एलएमईवर कॉपर आणि अॅल्युमिनियमसारख्या बेस मेटल्समध्ये 2 ते 4 टक्क्यांची घसरण झाली असून मेटल शेअर्सवर दबाव राहू शकतो.
अर्थसंकल्पात F&O व्यवहारांवरील STT वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारला यामुळे दरवर्षी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. मात्र बजेटनंतर बाजारात झालेल्या विक्रीमुळे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप कमी झाले होते. याचा परिणाम ट्रेडर्सच्या मनोवृत्तीवर अजूनही जाणवत आहे.
रविवार असूनही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्समध्ये मिळून सुमारे 3,957 कोटी रुपयांची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) देखील सुमारे 700 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सध्या सावध भूमिका दिसून येते.
ब्रोकरेज हाऊसेस बजेटमधील वित्तीय शिस्त आणि विकासाचा समतोल सकारात्मक मानत आहेत. मॉर्गन स्टॅन्ले भारतीय बाजाराबाबत आशावादी आहे, तर नुवामाला कर महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. एसबीआयचे अध्यक्ष सी.एस. शेट्टी यांनी पुढील आर्थिक वर्षात सुमारे 0.25 टक्के व्याजदर कपातीची शक्यता व्यक्त केली आहे.
आज Indus Towers, PG Electro, PB Fintech आणि UPL या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असून, या शेअर्समध्ये व्यवहारादरम्यान चांगली हालचाल पाहायला मिळू शकते.