Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 33 अंकांच्या वाढीसह 24,285 च्या आसपास खुला झाला, तर सेन्सेक्स 88 अंकांनी वाढून 77,629 च्या आसपास सुरू झाला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीने 24,300 चा टप्पाही ओलांडला.
बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्यही वाढले आहे.
आजच्या व्यवहारात फायनान्शियल, आयटी, मीडिया आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. इन्फोसिस, हिंडाल्को, एचसीएल टेक आणि टाटा स्टील हे सुरुवातीच्या व्यवहारात आघाडीवर राहिले. मात्र, ऑटो, फार्मा आणि काही PSU बँकिंग शेअर्समध्ये तुलनेने दबाव दिसून आला. सिप्ला, अपोलो हॉस्पिटल्स, ग्रासिम आणि टायटनच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
शेअर बाजारातील तेजीमागे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. अमेरिकेकडून इराणवरील नव्या आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बाजाराचे लक्ष भू-राजकीय घडामोडींकडे लागले आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांची घसरण होऊन ते सुमारे 92.60 डॉलर प्रति बॅरलवर आले. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी तेलाच्या किमतीतील घसरण सकारात्मक मानली जाते.
दरम्यान, आशियाई शेअर बाजारात मिश्र वातावरण दिसून आले. जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांवर दबाव होता. तर अमेरिकेतील शेअर बाजार शुक्रवारी वाढीसह बंद झाले होते. त्यामुळे भारतीय बाजाराला सुरुवातीला सकारात्मक आधार मिळाला.
याआधी भारतीय बाजारात सलग दोन आठवडे दबाव दिसून आला होता. शुक्रवारी निफ्टी 24,252 च्या आसपास, तर सेन्सेक्स 77,540 च्या आसपास बंद झाला होता. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आलेली तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरली.
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीसाठी 24,125 ते 24,225 हा सपोर्ट झोन महत्त्वाचा मानला जात आहे. तर वरच्या बाजूला 24,335 ते 24,425 हा महत्त्वाचा रेझिटंट मानला जात आहे. निफ्टी या पातळीच्या वर टिकल्यास पुढील तेजीची शक्यता वाढू शकते, मात्र बाजाराची पुढील दिशा कच्च्या तेलाच्या किमती, इराण-अमेरिका घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर अवलंबून राहील.