Mutual Funds | सेकंड इनिंग आणि म्युच्युअल फंडस्‌

Mutual Funds |
Mutual Funds | सेकंड इनिंग आणि म्युच्युअल फंडस्‌
Published on
Updated on

अनिल पाटील, प्रवर्तक : एस. पी. वेल्थ, एमएफडी प्रा. लि.

आजच्या तरुणाईने उद्याचे वृद्धापकाळाचे भान ठेवायला हवे. डोक्यावर चांदी येते तेव्हा खिशात पैसे खुळखुळायला हवेत, अन्यथा पैशासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करायला लागते. याचे भान ठेवायला हवे. कारण आज भारतातील प्रत्येक तरुणांना बहुतांश नोकरदार, छोटे छोटे व्यावसायिकांना, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सरकारकडून पेन्शन मिळणार नाही. आपला निवृतीकाळ आनंदात जाण्यासाठी स्वतःचा निवृत्ती निधी उभारणे ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी बनली आहे.

रिटायरमेंट निधी उभारण्यासाठी पोष्टातील योजना, बँक ठेवी, लाईफ इन्शुरन्स योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) यांसारखी पारंपरिक साधने अजूनही उपयुक्त आहेत; परंतु त्यांची लवचिकता, तरलता, वाढीच्या आणि महागाईवर मात करण्याची क्षमता या बाबतीत मर्यादा आहेत. इथेच म्युच्युअल फंडस्‌ एक क्रांतिकारी पर्याय म्हणून उभे राहतात. म्युच्युअल फंडस्‌ आणि निवृत्ती नियोजन यांचा समन्वय 'संयम आणि शिस्त' या तत्त्वावर उभा आहे. मुख्य आकर्षण 'चक्रवाढ व्याजाची ताकद तत्त्वात आहे. जरी अशा परताव्याची कोणतीही खात्री नसली आणि ते बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असले, तरी इक्विटी-ओरिएंटेड स्कीम्समध्ये २०-३० वर्षे नियमितपणे गुंतवलेल्या पैशांमध्ये पारंपरिक निश्चित-उत्पन्न पर्यायांपेक्षा महागाईवर अधिक प्रभावीपणे मात करण्याची क्षमता असल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या दिसून आले आहे. डायव्हर्सीफाईड ईक्विटी-ओरिएंटेड फंडांमध्ये २०-३० वर्षांच्या दीर्घ कालावधीत गुंतवणूक केल्यास ऐतिहासिकदृष्ट्या १२-१५% परतावा मिळालेला दिसतो, जो कोणत्याही वरील निश्चित उत्पन्नाच्या पर्यायाला आणि महागाईला मागे टाकत असलेला दिसतो.

निवृत्ती नियोजनाचे रणनीती आखताना

सध्याचे तुमचे वय किती आहे? तुमच्या जोडीदाराचे वय किती आहे? वयाच्या कोणत्या वर्षी निवृत्त होणार आहात? तुमचा सध्याचा दैनदिन खर्च किती आहे? सध्या महागाई दर किती आहे? तुमचे आयुष्य मर्यादा किती असणार? निवृत्तीनंतर कोणकोणते खर्च वाढणार? या सर्वांचा बारकाईने विचार करून वयाच्या ८० वर्षापर्यंत निवृत्तीसाठी रणनीती आखली पाहिजे. रणनीती कशी असावी त्यासाठी उदा पाहू. आज सचिन नावाच्या एका व्यक्तिचे वय वर्षे ३५ असेल अन्‌ दरमहाचा खर्च ३०,०००/- असेल तर ६० व्या वर्षी हा खर्च १,६२,८००/- इतका अन्‌ वयाच्या ७०व्या वर्षी ३,२०,३००/- इतका खर्च असणार आहे. त्यासाठी सचिनकडे ४.२५ कोटी निवृत्ती निधीची गरज भासणार आहे . सचिनला आपल्या आनंदी निवृत्ती जीवनासाठी दोन टप्प्यात नियोजन करावे लागणार आहे १) संचय टप्पा (कमावताना) आणि २) वितरण टप्पा (निवृत्तीनंतर).

१. संचय टप्पा : वरील उदाहरणामध्ये सचिनला वयाच्या ६० व्यावर्षी ४.२५ कोटी निवृत्ती निधी निर्माण करावा लागणार आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणार, त्या ठिकाणी किती परतावा मिळणार यावरून तुमची गुंतवणूक रक्कम ठरणार आहे. कमी परतावा असेल, तर जास्त गुंतवणूक. परतावा अधिक असेल, तर कमी रक्कम जास्त काळासाठी गुंतवणूक करावी लागणार, हे लक्षात घ्यावे. सर्वाधिक परताव्यासाठी म्युच्युअल फंडात SIP भूमिका महत्त्वाची ठरते. दर महिन्याला ठराविक रक्कम सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे, तुम्ही तुमच्या चांगल्या सल्लागाराकडून विविध म्युच्युअल फंड योजनांचा संच (Portfolio) तयार करून ठराविक रक्कम नियमितपणे (उदा. दरमहा) गुंतवू शकता. याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

बाजाराची वेळ न साधता सातत्याने गुंतवणूक करता येते. 'रुपी-कॉस्ट ॲव्हरेजिंग'चा फायदा मिळतो, ज्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी होतो. शिस्तबद्ध, दीर्घकालीन बचतीची सवय लागते. छोटी छोटी रक्कमही गुंतविता येते. बाजारातील तज्ज्ञांकडून गुंतवणूक व्यवस्थापन कमी खर्चात होते. या क्षेत्रावर सेबीचे सर्वोत्तम निंयत्रण केले जात आहे. म्युच्युअल फंडात बाजाराची जोखीम असते. दीर्घकाळामध्ये ही जोखीम मात्र कमी होते. छोट्या रकमेलाही निवृत्तीपर्यंत चक्रवाढीचा मोठा फायदा मिळतो. या सर्व गोष्टीमुळे निवृत्ती नियोजन खूप चांगल्याप्रकारे होऊ शकते.

२. वितरण टप्पा :

एकदा तुम्ही निवृत्त झालात की, वयाच्या साठीनंतर ऐंशी वर्षांपर्यंत तुम्हाला उत्पन्न नसणार आहे. पण खर्च मात्र मोठा असणार आहे. आज निर्माण केलेला निधी भविष्यात महागाईच्या विळख्यात गरजेनुसार वापरण्यासाठी प्रभावी नियोजन केले पाहिजे. यासाठी इथे सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) उपयुक्त ठरतो. SWP तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून दर महा एक निश्चित रक्कम काढण्याची परवानगी देतो, तर उर्वरित रक्कम गुंतवलेली राहते आणि वाढत राहते. यासाठी तुमच्या निवृत्ती वेळच्या शेवटच्या क्षणापर्यंत टप्पे तयार करून गुंतवणूक केली पाहिजे. निवृत्ती काळात एकरकमी पैसे काढण्यापेक्षा SWP माध्यमातून वाढत्या महागाईनुसार पैशाचा प्रवाह वाढणारा ठेवला पाहिजे. याठिकाणी दर महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रत्येक वेळेस काढलेल्या रकमेतील 'भांडवली नफ्यावर' कर आकारला जातो, तो मुदत ठेवींपेक्षा अधिक कर-बचत करणारा पर्याय ठरतो.

म्युच्युअल फंडस्‌च्या माध्यमातून निवृत्तीचा निधी उभा करताना...

म्युच्युअल फंडात जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त (High Risk, High Return) हा फार्मुला चालतो. जोखीम किती घ्यावी? परतावा किती मिळणार? हे (Risk & Reward) तुमची गुंतवणूक रणनीती (Portfolio) कशी केली आहे? त्यावर अवलंबून असते. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील विविध जोखीम आणि योजनांचा तपशील समजावून घेतला पाहिजे. त्यासाठी सेबी रजिस्टर गुंतवणूक सल्लागाराची अथवा (CFP) आर्थिक नियोजनकार यांची मदत घ्यावी. (टीप : निवृत्ती जवळ येईल तशी तुमची गुंतवणूक इक्विटीमधून सुरक्षित 'डेट' (Debt) फंडांकडे वळवणे नेहमी चांगले असते.)

खरेतर निवृत्तीचे नियोजन ही केवळ एक आर्थिक सोय नसून आत्मसन्मानाची गोष्ट बनली आहे. सरकारी-निमसरकारी नोकरदार असो, छोटे व्यावसायिक असो किंवा खासगी क्षेत्रात काम करणारे तरुण प्रत्येकाने आपल्या निवृत्ती नियोजनासाठी सोय करणे गरजेचे आहे. (सेकंड इनिंग) निवृत्तीच्या काळात तुम्ही पैशाने श्रीमंत असलेच पाहिजे. उद्याची श्रीमंती आज किती कमावले यावर नव्हे, तर भविष्यासाठी किती शिल्लक ठेवले आणि ती किती टक्क्यांनी वाढली यावर अवलंबून असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news