Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Rally: ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने बाजारात खळबळ; सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Rally: अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Rally: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्सने एकाच झटक्यात 1,000 हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टीतही जोरदार तेजी दिसून आली.

शुक्रवारी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्सने मागील बंद पातळी 73,832 च्या तुलनेत मोठी झेप घेत 74,709 वर सुरुवात केली. काही मिनिटांतच तो 74,859 च्या आसपास पोहोचला. दुसरीकडे, एनएसई निफ्टीनेही 23,161 च्या तुलनेत मोठी वाढ घेत 23,412 वर सुरुवात केली आणि त्यानंतर आणखी वाढ झाली.

बाजार उघडण्यापूर्वीच गिफ्ट निफ्टीने तेजीचे संकेत दिले होते. गिफ्ट निफ्टी 23,458 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यामुळे निफ्टीमध्ये जवळपास 300 अंकांच्या गॅप-अपची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात बाजाराने त्याहूनही अधिक दमदार कामगिरी केली.

जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींचा भारतीय बाजाराला मोठा आधार मिळाला. गुरुवारी अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले. डाऊ जोन्समध्ये 1.86 टक्के, एस अँड पी 500 मध्ये 1.75 टक्के, तर नॅस्डॅकमध्ये तब्बल 2.5 टक्क्यांची वाढ झाली. तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे अमेरिकन बाजारांना बळ मिळाले.

याच सकारात्मकतेचा प्रभाव आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई 225 तीन टक्क्यांहून अधिक वाढला, हाँगकाँगचा हँगसेंग 1.5 टक्क्यांनी वर गेला, तर शांघाय कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकही तेजीत व्यवहार करत होता.

बाजारातील या तेजीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराची आशा. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेत महत्त्वाची चर्चा झाल्याचा दावा केला आहे. प्रस्तावित करारातील प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली असून लवकरच करारावर स्वाक्षरीची तारीख जाहीर केली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.

यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 89 डॉलरच्या खाली आला असून डब्ल्यूटीआय क्रूडही 87 डॉलरच्या आसपास आहे. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत चार टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही सकारात्मक बाब मानली जाते. त्यामुळे महागाई आणि आयात खर्चावरचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

मात्र, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री अद्याप सुरूच आहे. 11 जून रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे 1,987 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4,224 कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला आधार दिला. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 45 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे.

आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिका-इराण चर्चेतील पुढील घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयातील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर राहणार आहेत. सध्या जागतिक संकेत सकारात्मक असल्यामुळे बाजारातील तेजी कायम राहण्याची आशा व्यक्त केली जात असली, तरी परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT