Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 24,100 च्या खाली, सेन्सेक्स 290 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून निफ्टी 24,100 च्या खाली, तर सेन्सेक्स 290 हून अधिक अंकांनी घसरला.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बाजार उघडताच निफ्टी 50 मध्ये 122 हून अधिक अंकांची घसरण होऊन तो 24,053 च्या आसपास पोहोचला, तर सेन्सेक्स जवळपास 294 अंकांनी घसरून 76,970 च्या पातळीवर आला. त्यामुळे निफ्टीची पुन्हा एकदा 24,100 च्या महत्त्वाच्या पातळीखाली घसरण झाली आहे.

ब्रॉडर मार्केटमध्येही विक्रीचा दबाव कायम राहिला. बँक निफ्टी सुमारे 196 अंकांनी, तर निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 260 हून अधिक अंकांनी घसरून व्यवहार करत होता.

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होण्याचे संकेत

बाजाराच्या सुरुवातीपूर्वीच गिफ्ट निफ्टीमध्ये घसरणीचे संकेत दिसत होते. गिफ्ट निफ्टी सुमारे 24,232 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावाच्या तुलनेत तो जवळपास 110 अंकांच्या डिस्काउंटवर होता. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात नकारात्मक होण्याची शक्यता होती.

मागील सत्रात बाजाराची दमदार क्लोजिंग

दरम्यान, मागील सत्रात भारतीय शेअर बाजाराने दमदार कामगिरी केली होती. सेन्सेक्स 330.92 अंक म्हणजेच 0.43 टक्क्यांनी वाढून 77,264.51 वर बंद झाला होता.

त्याचवेळी निफ्टी 50 मध्ये 84.80 अंकांची म्हणजेच 0.35 टक्क्यांची वाढ झाली होती आणि निर्देशांक 24,175.65 वर स्थिरावला होता. त्यामुळे मागील सत्रातील तेजी टिकवून ठेवण्यात बाजाराला आज अपयश आले.

बाजारासाठी आज कोणते ट्रिगर महत्त्वाचे?

आजच्या व्यवहारावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी अमेरिका-इराणमधील वाढता तणाव हा सर्वात मोठा ट्रिगर मानला जात आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून तेलाचा भाव 90 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.

दुसरीकडे, गिफ्ट निफ्टीतील घसरण आणि डाऊ फ्युचर्समधील घसरण यामुळेही बाजारातील वातावरणावर दबाव आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात झालेली घसरण हा देखील भारतीय बाजारासाठी नकारात्मक संकेत आहे.

FII विक्रीचा दबाव कायम

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII ने 5,665 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII सलग 14व्या दिवशी खरेदीदार राहिले आहेत. त्यामुळे बाजाराला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून काहीसा आधार मिळत आहे.

फेडच्या भूमिकेचा कमोडिटी बाजारावर परिणाम

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या कठोर भूमिकेचाही बाजाराच्या सेंटिमेंटवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सुमारे 2,500 रुपये, तर चांदीच्या दरात 4,000 रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे चित्र आहे.

HDFC Bank कडेही बाजाराचे लक्ष

आजच्या व्यवहारातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे HDFC Bank. बँकेचे MD आणि CEO यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या ADR मध्ये जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे HDFC Bank च्या शेअरवर आज गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे.

IIP आणि GDP आकडेवारीही महत्त्वाची

आर्थिक आघाडीवरही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जुलै महिन्यातील IIP वाढ 6.7 टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय आज पहिल्या तिमाहीतील GDPची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे या आकडेवारीचा बाजाराच्या पुढील दिशेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

MSCI री-बॅलन्सिंगचा परिणाम

आजच्या व्यवहाराच्या अखेरीस MSCI री-बॅलन्सिंगमधील बदल लागू होणार आहेत. त्यामुळे काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होण्याची शक्यता असून, बाजारातील अस्थिरता वाढू शकते.

निफ्टी आणि बँक निफ्टीची रणनीती काय?

बाजार तज्ज्ञ अनिल सिंघवी यांच्या मते, सध्याचे ग्लोबल सेंटिमेंट नकारात्मक आहेत आणि FII ची विक्री होत आहे. दुसरीकडे DII चा कल सकारात्मक आहे. F&O सेंटिमेंट सध्या न्यूट्रल असून एकूण बाजारातील वातावरण सावध राहण्याचे संकेत देत आहे.

मात्र, बाजाराचा व्यापक ट्रेंड अद्याप सकारात्मक असल्याचे मानले जात आहे. FII ची लॉन्ग पोझिशन 9.83 टक्क्यांवरून घटून 9.63 टक्क्यांवर आली आहे.

निफ्टीचा PCR 0.77 वरून 0.88 झाला आहे, तर बँक निफ्टीचा PCR 1.12 वरून 1.13 झाला आहे. त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स पातळीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT