सप्टेंबर महिन्यापासून शेअर मार्केट (Stock market) कोसळताना दिसत आहे. अशावेळी आपले गुंतवणूक मूल्य कमी होताना दिसतेय. बाजारात ‘मार्केट अजून किती खाली जाईल?’ ही मनात भीती निर्माण होत असल्यामुळे अनेक लोक आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. मार्केट तेजीत असेल तर रोज पैसे वाढत असतात. तर मंदीमध्ये पैसे कमी होतात, हे सूत्र आहे. ते समजून घ्यायला हवे.
तेजी आणि मंदी हा मार्केटचा स्वभाव आहे, हे समजावून घेतले पाहिजे. तेजीमध्ये नफा घेतला पाहिजे आणि मंदीमध्ये गुंतवणूक वाढविली पाहिजे. तरच तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता. भांडवली बाजार हा दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा मार्ग आहे. आपल्या गुंतवणुकीसाठी मोठा वेळ दिला पाहिजे. इक्विटी म्युच्युअल फंडात मागील वर्षापासून गुंतवणूक सुरू केली त्यांना नुकसान झालेले दिसते. आणि ते अजून नुकसान होईल म्हणून एसआयपी भरणे बंद करीत आहेत. ज्या वेळी मार्केट खाली येते त्यावेळेला म्युच्युअल फंडात घेतलेल्या युनिटचे दर कमी होतात. अशावेळी आपण गुंतवणूक वाढविणे गरजेचे असते. गुंतवणूक वाढविली तर कमी दराने आपल्याला अधिक युनिट मिळतात आणि भविष्यात त्याचा फायदा फार चांगला होतो. मागील 45 वर्षांच्या इतिहासात मार्केट बर्याचदा पडलेले दिसते; पण नंतरच्या ठराविक काळात पुन्हा वाढलेले पाहायला मिळते.
मे 2006 मध्ये 12500 अंक सेन्सेक्स उच्चांकी पातळीवर होता. त्यानंतर जून 2006 मध्ये 9062 पर्यंत नीचांकी पातळीवर म्हणजेच 25% नी मार्केट पडले होते. अवघ्या आठ महिन्यांत फेब्रुवारी 2007 मध्ये 14500 अंकांनी बाजाराने पुन्हा नवीन उच्चांक गाठला होता.
जानेवारी 2008 मध्ये 20800 अंकांचा नवीन उच्चांक गाठला होता. त्यात जागतिक आर्थिक संकट आले. परदेशी गुंतवणूकदारानी एक लाख कोटींची रक्कम काढून घेतली. मग मार्च 2009 मध्ये सेन्सेक्स 8600 पर्यंत खाली कोसळला होता. गुंतवणूकदारांचे 58% नुकसान झाले होते. त्यानंतर नोव्हे. 2010 मध्ये 20800 अंक गाठला. त्यानंतर डिसे. 2014 मध्ये सेन्सेक्समध्ये तीव्र सुधारणा दिसून आली, 28500 अंकांपर्यंत मजल गेली. बाजाराने जाने. 2014 मध्ये 29500 चा नवीन उच्चांक गाठला होता.
2015 मध्ये सेन्सेक्समध्ये जोरदार सुधारणा झाली, सेन्सेक्सने 29500 हा नवीन उच्चांक गाठला. महागाई आणि व्याजदर वाढीच्या चिंतेमुळे फेब्रु. 2016 पर्यंत 23%ची घसरण होऊन सेन्सेक्स 22900 पर्यंत खाली आला.
जाने. 2018 मध्ये 36000 चा नवीन उच्चांक गाठला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वित्तीय तुटीच्या चिंतेमुळे मार्च 2018 मध्ये 32500 पर्यंत सेन्सेक्स कोसळला. त्यात सुमारे 14% घसरण झाली. त्यानंतर सेन्सेक्सने ऑगस्ट 2018 मध्ये नवीन उच्चांक करत तो 38800 वर पोहोचला.
ऑक्टो. 2018 मध्ये मार्केट परत 33600 पर्यंत खाली आले. जून 2019 मध्ये 40200 चा नवीन उच्चांक गाठला.
जाने. 2020 सेन्सेक्सने 41900 चा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. मार्च 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारामुळे झालेल्या क्रॅशनंतर, मार्च 2020 मध्ये 25980 पर्यंत 38% बाजार खाली आला. परत हा सेन्सेक्स नोव्हे. 2020 मध्ये 41800 पर्यंत वरती आला. आक्टो. 2021 ला सेन्सेक्स मध्ये जोरदार सुधारणा झाली, या महिन्यात 61700 पर्यंत तो नवीन पातळीवर पोहोचला. जाने. 2020 ते आक्टो. 21 या कालावधीत 42% ची वृद्धी पहावयास मिळाली. ही सुधारणा झाल्यानंतर, रशिया-युक्रेन संघर्ष आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे जून 2022 महिन्यात सेन्सेक्स 51300 वर घसरला. सेन्सेक्समध्ये सुमारे 20% घसरण झाली.
2023-2024 : रशिया युक्रेन युद्धामुळे सर्वत्र व्याजदर वाढले. महागाई वाढली. तशी जागतिक आर्थिक मंदी आणि देशांतर्गत आव्हानांमुळे मार्च 2023 मध्ये सेन्सेक्स दर 57600 पर्यंत खाली आले. सेन्सेक्समध्ये सुमारे 10% घसरण झाली होती. त्यानंतर मार्केट वाढत राहिले. सप्टे. 2024 मध्ये त्याने 85978 अंकांपर्यंत नव्या पातळीवर मजल मारली. त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली. आज फेब्रु. 2025 मध्ये सेन्सेक्स 75939 अंकांपर्यंत खाली आलेले पाहत आहोत.
सध्या मार्केट पडले आहे, अशा वेळी गुंतवणूक केली तर भविष्यात चांगला परतावा मिळतो. म्हणून आजसद्धा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. एक रकमी गुंतवणूक करण्यापेक्षा हळूहळू मार्केटचा कल पाहून गुंतवणूक केली पाहिजे.
आज आपल्या देशाची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. 144 कोटी लोक संख्येत अवघे 8 ते 9 % लोक आज भांडवली बाजारात उतरले आहेत. 2020 साली 4 कोटी डीमॅट खाती होती. ती आज 17 कोटी झाली आहेत. म्युच्युअल फंडात दरमहा 26000 कोटी एसआयपीने गुंतवणूक होत आहे. आज मार्केट पडले असले तरी भिण्याचे कारण नाही. उलट ही संधी आहे, त्याचा फायदा करून घ्यावा.
अमेरिकेची अर्थव्यवस्था 2 ते 3% वाढत आहे. युरोप 1 ते 2% वाढत आहे. चायना 4 ते 5% वाढत आहे. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था 2% वाढत असताना भारताची अर्थव्यवस्था 7 ते 8% वाढत आहे. आपला देश म्हणजे पळणारा घोडा आहे. बाकीचे देश हत्तीच्या चालीने चालत आहेत. आपण पळणार्या घोड्यावर गुंतवणूक केली पाहिजे. मार्केट हे अल्पकाळासाठी पडत असते आणि दीर्घकाळासाठी वाढत असते. हे लक्षात घेऊन गुंतवणूक करावी.
मार्केट पडण्याचे खरे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारानी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. चार्टची माहिती पाहिली असता 2008 पासून साडे सहा लाख कोटींहून अधिक रक्कम काढून घेतलेली आहे. सन 2024 आणि 2025 मध्ये आज पर्यंत 4.40 लाख कोटींच्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला आहे . 2008 पासून देशातील गुंतवणूकदारांनी 14.70 लाख कोटीची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेत मिळणारा चांगला व्याजदर, रुपयाची आणि डॉलरमधील होत असलेली घसरण आणि देशाअंतर्गत चाललेले व्यापार युद्ध ही याची प्रमुख कारणे आहेत. सध्या परदेशी गुंतवणूक काढून घेतल्याने ही मंदी निर्माण झाली आहे. आपल्या भारतीय शेअर मार्केटची परदेशी गुंतवणूकदारांकडून सुटका होत आहे, ही भविष्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे.