

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि.२४) सलग पाचव्या दिवशी घसरणीसह खुला झाला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी घसरून ७४,६०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह २२,६०० च्या खाली व्यवहार करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लागू करण्याच्या इशाऱ्याने बाजारात अवस्थता पसरली आहे. अमेरिकेसह आशियाई शेअर बाजारातही घसरण झाली आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून येत आहे.
आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्के घसरला आहे. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, मीडिया, मेटल, पीएसयू बँक, रियल्टी हे निर्देशांकही घसरणीसह खुले झाले आहेत. बीएसई मिडकॅप १.३ टक्के आणि स्मॉलकॅप १.७ टक्के घसरला आहे.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, झोमॅटो, टीसीएस, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर एम अँड एम, सन फार्मा, मारुती हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.