Stock Market Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. BSE Sensex सुमारे 400 अंकांनी घसरला, तर Nifty 50 100 अंकांनी खाली येत 24,500 च्या खाली गेला. विशेषतः आयटी क्षेत्रात दबाव दिसून आला आणि HCL Technologies च्या शेअर्समध्ये तब्बल 8 टक्क्यांची घसरण झाली.
जागतिक संकेत स्पष्ट नसल्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायर वाढवण्याची घोषणा केली असली, तरी पुढील वाटाघाटींबाबत संभ्रम कायम आहे. याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या भावना आणि बाजारावर होताना दिसतो.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रेंट क्रूड जवळपास 98 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे, जो बाजारासाठी नकारात्मक संकेत मानलो जातो. तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईचा दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही अस्थिरता कायम आहे. अमेरिकन बाजार दिवसाच्या उच्चांकावरून खाली घसरले, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. दुसरीकडे, सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्याचे दिसते.
परकीय गुंतवणूकदारांकडून (FIIs) काही प्रमाणात विक्री झाली असली, तरी निव्वळ खरेदी कायम आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) खरेदी सुरू ठेवत बाजाराला काही प्रमाणात आधार दिला आहे.
कॉर्पोरेट निकालांच्या पार्श्वभूमीवरही बाजारात चढ-उतार सुरू आहेत. HCL Tech चे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्याने आयटी क्षेत्रावर दबाव वाढला आहे. तर काही कंपन्यांनी चांगले निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.
आज Tech Mahindra, Trent Ltd आणि SBI Life Insurance यांचे निकाल येणार असल्याने बाजाराची दिशा ठरण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
एकूणच, जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमती आणि कॉर्पोरेट निकाल या घटकांवर आज बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. सध्या असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.