Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान

Stock Market Crash: शेअर बाजारात आज अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळला, तर निफ्टीही 250 अंकांनी खाली आला.

Rahul Shelke

Stock Market Crash Today: आज आठवड्यातील चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने सुरुवातीला सकारात्मक सुरुवात केली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात उघडले. मात्र काही मिनिटांतच चित्र पूर्णपणे बदलले आणि बाजारात जोरदार विक्री सुरू झाली. थोड्याच वेळात सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळून 83 हजारांच्या खाली आला, तर निफ्टी सुमारे 250 अंकांनी घसरून 25,567च्या आसपास पोहोचला.

बातमी लिहेपर्यंत सेन्सेक्स 913 अंकांनी घसरून 82,821 वर व्यवहार करत होता. निफ्टीचाही असाच प्रवास पाहायला मिळाला. 25,873 वर उघडलेला निफ्टी काही वेळातच 25,567 पर्यंत खाली आला.

या घसरणीचा थेट फटका गुंतवणूकदारांना बसला. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल एका दिवसात सुमारे 4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. मागील सत्रात 472 लाख कोटी रुपये असलेले मार्केट कॅप घसरुन 468 लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले.

घसरणीमागची तीन प्रमुख कारणे कोणती?

या अचानक आलेल्या क्रॅशमागे तीन मोठी कारणे आहेत.

पहिलं कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. गेल्या तीन दिवसांपासून बाजारात चांगली तेजी होती. अनेक गुंतवणूकदारांनी या तेजीचा फायदा घेत प्रॉफिट काढण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकले आणि त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव वाढला.

दुसरं कारण म्हणजे आयटी शेअर्समधील परदेशी गुंतवणूकदारांची विक्री. एआयमुळे आयटी क्षेत्रावर आधीच दबाव आहे. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात अवघ्या 15 दिवसांत जवळपास 10,956 कोटी रुपयांचे आयटी शेअर्स विकले आहेत. त्यामुळे आयटी स्टॉक्समध्ये जोरदार घसरण दिसून आली आणि त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर झाला.

तिसरं मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव. या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइल 71 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहे. तेलाच्या किमती वाढल्या की भारतासारख्या आयातदार देशांवर आर्थिक दबाव वाढतो आणि बाजारातील गुंतवणूकदारांना याचा फटका बसतो.

कोणते शेअर्स सर्वाधिक घसरले?

या घसरणीत बीएसईच्या 30 मोठ्या कंपन्यांपैकी तब्बल 29 शेअर्स लाल रंगात होते. क्वालिटी वॉल, ट्रेंट, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

मिडकॅप शेअर्समध्ये पर्सिस्टंट, पेटीएम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि डिक्सन यांचे शेअर्स जोरात पडले. स्मॉलकॅपमध्ये कोहन्स आणि आयआयएफएलसारख्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

गुंतवणूकदारांसाठी काय संकेत आहेत?

सध्याची घसरण ही जागतिक घडामोडी, तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे झाली आहे. अशा परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी संयम ठेवणे गरजेचे आहे. बाजारात चढ-उतार होत असतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून विक्री करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घ्यावा.

(नोंद: शेअर बाजारातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT