Stock Market Closing Updates
मध्य पूर्वेतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढीचा दबाव गुरुवारी (दि.१२ जून) भारतीय शेअर बाजारात दिसून आला. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी १ टक्के घसरले. सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरून ८१,६९१ वर बंद झाला. तर निफ्टीच्या सलग सहा सत्रांतील तेजीला आज ब्रेक लागला. निफ्टी ५० निर्देशांक २५३ अंकांच्या घसरणीसह २४,८८८ वर स्थिरावला. आयटी शेअर्समध्ये विक्रीचा जोर अधिक राहिला.
आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे ७ लाख कोटींनी कमी होऊन ४४९.४२ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.
इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढलाय. यामुळे मध्य पूर्वेत कधीही मोठे युद्ध भडकू शकते? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आज सावध भूमिका घेतली. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात बंद झाले. दोन्ही निर्देशांकांनी तेजीत सुरुवात केली होती. त्यानंतर त्यात चढ-उतार राहिला. तर दुपारनंतर घसरण वाढत गेली. दरम्यान, बीएसई मिडकॅप १.५ टक्के आणि स्मॉलकॅप १.३ टक्के घसरून बंद झाला.
सेन्सेक्सवरील ३० पैकी २७ शेअर्स लाल रंगात बंद झाले. केवळ ३ शेअर्समध्ये वाढ दिसून आली. त्यात बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा शेअर्सचा समावेश होता. सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स २.८ टक्के घसरला. टायटन, इर्टनल, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, एलटी, एम अँड एम हे शेअर्स २ ते २.५ टक्क्यांपर्यंत घसरले.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) आदी तेल कंपन्यांचे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी कच्च्या तेलाचा दर सुमारे ४ टक्के वाढून प्रति बॅरल ७० डॉलर जवळ पोहोचला. गेल्या दोन महिन्यांतील हा दर आहे.
संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवरही प्रॉफिट बुकिंगचा दबाव दिसून आला.