Stock Market Closing Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.३०) अस्थिरता दिसून आली. यामुळे सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर स्थिरावले. सेन्सेक्स ४६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८०,२४२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४,३३४ (-१.७५ अंक) वर स्थिरावला.
भारत- पाकिस्तानदरम्यान वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका तसेच अमेरिकेतील व्यापार वाटाघाटीबाबत आशावाद कमी झाल्याचा दबाव भारतीय शेअर बाजारात दिसून आला.
सेक्टर्समधील रियल्टी निर्देशांक १.९ टक्के वाढून बंद झाला. टेलिकॉम १ टक्के वाढला. तर मीडिया, PSU बँक निर्देशांक प्रत्येकी २ टक्के घसरले. आयटी, बँक, कन्झ्यूमर ड्युराबेल्स, कॅपिटल गुड्स प्रत्येकी ०.५ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा मारा दिसून आला. बीएसई मिडकॅप ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप (BSE Smallcap)१.७ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्के घसरले. टाटा मोटर्स, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, टाटा स्टील, टीसीएस, एनटीपीसी हे शेअर्स १ ते ३ टक्के घसरले. तर दुसरीकडे मारुती, भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत राहिले.
बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदवली होती. पण ही तेजी टिकून राहिली नाही. दरम्यान, भयसूचकांक इंडिया VIX आजच्या सत्रात ५ टक्क्यांनी वाढून १८ अंकांच्या पुढे पोहोचला. हा निर्देशांक बाजारातील अस्थिरता दर्शवत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्याच्या भू-राजकीय तणावादरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजाराला मोठी साथ दिली आहे. त्यांनी सलग १० व्या सत्रांत खरेदी कायम ठेवली. त्यांनी १० सत्रांत ३७,३२५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. मंगळवारी (२९ एप्रिल) परदेशी गुंतवणूकदारांनी २,३८५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीदेखील (DIIs) तिसऱ्या दिवशी खरेदीवर जोर कायम ठेवला. त्यांनी मंगळवारी एका दिवसात १,३६९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यामुळे सध्याच्या भू-राजकीय तणावाच्या परिस्थितीत बाजाराला मोठा आधार मिळाला आहे.