Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि. ७ जुलै) अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स केवळ ९ अंकांनी वाढून ८३,४४२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांकात कोणतीही वाढ दिसून आली नाही. निफ्टी २५,४६१ वर स्थिरावला.
कन्झ्यूमर आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर फायनान्सियल आणि आयटी शेअर्समध्ये घसरण झाली.
९ जुलै रोजीच्या अमेरिकेच्या टॅरिफ लागू करण्याच्या डेडलाइनपूर्वी बाजारात अनिश्चितता वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, बाजारात चढ-उतार राहिला.
क्षेत्रीय निर्देशांकांतील एफएफसीजी १.६ टक्के वाढला. ऑईल अँड गॅस निर्देशांकही ०.४ टक्के वाढला. तर दुसरीकडे मी़डिया १ टक्के घसरला. आयटी, मेटलमध्ये घसरण दिसून आली. दरम्यान, मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅप ०.३ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स ३ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. कोटक बँक, ट्रेंट, रिलायन्स, आयटीसी, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स ०.५ ते १ टक्क्यापर्यंत वाढले. तर दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर्स २.४ टक्के घसरला. टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, इर्टनल, इन्फोसिस, एचसीएल टेक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स ०.५ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
आज बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली होती. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत बाजारात चढ-उतार होत राहिला. अमेरिकेचे टॅरिफ धोरण तसेच विदेशी आणि देशांतर्गंत गुंतवणूकदारांच्या विक्रीचाही बाजारात दबाव राहिला आहे.