Silver Price 3 Lakh Pudhari
अर्थभान

Silver Price 3 Lakh: चांदी थेट 3 लाखांवर! अवघ्या 9 महिन्यांत तीनपट वाढ… नेमकं कारण काय?

Silver Price 3 Lakh Per kg MCX: MCX वर चांदीचा भाव 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. गेल्या 9 महिन्यांत चांदीने जवळपास तीनपट वाढ देत 200% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

Rahul Shelke

चांदीच्या दरांनी गुंतवणूकदारांना आणि सामान्य ग्राहकांनाही अक्षरशः धक्का दिला आहे. कारण भारतीय वायदा बाजारात (MCX) चांदीचा भाव थेट 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये जी चांदी 95-96 हजार रुपये प्रति किलोच्या आसपास होती, ती आता 3 लाख रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचली आहे. ही वाढ सामान्य मागणीमुळे नाही, तर जगात सुरू असलेल्या मोठ्या आर्थिक संघर्षामुळे झाली आहे, असं बाजार तज्ज्ञ सांगतात.

9 महिन्यांत चांदीने दिला ‘मल्टीबॅगर’ परतावा

चांदीच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना ‘मल्टीबॅगर’ परतावा मिळाला आहे. गेल्या 9 महिन्यांत चांदीचे दर जवळपास तीन पट वाढले आहेत. म्हणजे एप्रिलपासून आतापर्यंत चांदीने गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

विशेष म्हणजे, फक्त जानेवारी महिन्यातच चांदीच्या दरांमध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या चांदी ही शेअर्स, प्रॉपर्टी आणि इतर गुंतवणूक साधनांना मागे टाकत सर्वाधिक परतावा देणारी मालमत्ता ठरत आहे.

अचानक दर कशामुळे वाढले?

सध्या अमेरिका आणि युरोप यांच्यात तणाव वाढताना दिसतोय. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनसह 8 युरोपीय देशांवर मोठे आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिल्यामुळे बाजारात अस्थिरता वाढली. अहवालांनुसार, 1 फेब्रुवारीपासून 10% शुल्क लागू होऊ शकतं आणि ते पुढे जूनपर्यंत 25% पर्यंत वाढू शकतं.

ट्रेड वॉरचा परिणाम

जेव्हा जगात मोठ्या देशांमध्ये व्यापारयुद्ध (Trade War) सुरू होतं, तेव्हा गुंतवणूकदार विचार करतात की, पैसे सुरक्षित ठिकाणी हलवायचे. अशा वेळी शेअर बाजार, बॉन्ड्स किंवा काही चलनांच्या गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे लोक आपली गुंतवणूक सोने-चांदीसारख्या सुरक्षित धातूंमध्ये करतात. आणि आज नेमकं तेच सुरू आहे. यामुळे मागणी वाढते आणि मागणी वाढली की दरही वाढतात.

हा वाद केवळ अमेरिकेपुरताच नाही. युरोपियन युनियनही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं. काही रिपोर्ट्सनुसार युरोपकडे ‘Anti-Coercion Instrument (ACI)’ नावाचं एक मजबूत टूल आहे. त्याचा वापर करून युरोप अमेरिकेच्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लावू शकतो. चर्चा अशी आहे की अमेरिकेच्या मालावर जवळपास 93 अब्ज युरो (म्हणजेच अंदाजे 108 अब्ज डॉलर) इतका कर बसू शकतो. त्यामुळे जागतिक बाजारात तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारातही चांदीचा भडका

या घडामोडींचा परिणाम जगभर दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीत जोरदार वाढ झाली आहे. रिपोर्ट्सनुसार स्पॉट गोल्ड आणि चांदीचे दर उच्चांकावर गेले असून चांदी 93 डॉलरच्या पुढे गेल्याचं चित्र दिसतंय. इतकंच नाही, तर प्लॅटिनम आणि पॅलेडियमसारख्या धातूंमध्येही तेजी दिसून आली आहे.

डॉलरवर विश्वास कमी होतोय?

बाजारातील काही जाणकार सांगतात की सध्याची परिस्थिती केवळ ट्रेड वॉरपुरती नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्चितता आणि फेडरल रिझर्व्हवर होणाऱ्या राजकीय दबावामुळे डॉलरवरचा विश्वासही काही प्रमाणात कमी होतोय, अशी चर्चा आहे.

पुढे काय? दर आणखी वाढू शकतात का?

तज्ज्ञांच्या मते, जगभरातील तणाव कमी झाला नाही आणि ट्रेड वॉरची परिस्थिती अधिक तीव्र झाली, तर सोन्या-चांदीचे दर आणखी नवे उच्चांक गाठू शकतात. मात्र एवढ्या मोठ्या वाढीनंतर काही काळ नफा वसुलीही होऊ शकते, त्यामुळे दरांमध्ये चढ-उतार होऊ शकतो.

एकूणच, चांदीचा 3 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठणं ही केवळ आर्थिक बातमी नाही, तर जगातील बदलत्या राजकीय-आर्थिक परिस्थितीचं प्रतिबिंब आहे. ट्रेड वॉरची भीती, डॉलरची अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी, यामुळे चांदीने ‘रातोरात’ मोठी झेप घेतली आहे.

टीप: ही बातमी माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT