पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) शुक्रवारी (दि.१०) सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आजच्या अस्थिर सत्रात बाजारात चढ- उतार राहिला. सेन्सेक्स (Sensex) २४१ अंकांनी वाढून ७७,३७८ वर बंद झाला. तर निफ्टी ९५ अंकांच्या घसरणीसह २३,४३१ वर स्थिरावला. आज आयटी शेअर्सनी (IT stocks) दमदार कामगिरी केली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.
आज आयटी निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. पॉवर, रियल्टी, हेल्थकेअर, पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी २ टक्के घसरले. मिडकॅप निर्देशांक २.१ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.४ टक्के घसरला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज १० जानेवारी रोजी ५.७ लाख कोटींनी कमी होऊन ४२९.७९ लाख कोटींवर आले. ९ जानेवारी बाजार भांडवल ४३५.४९ लाख कोटी होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ५.७ लाख कोटींचा फटका बसला.
निफ्टी आयटी निर्देशांक आज ३.४ टक्के वाढला. टीसीएसच्या मजबूत तिमाही कामगिरीने आज गुंतवणूकदारांना प्रभावित केले. यामुळे निफ्टी आयटीवर टीसीएसचा (TCS shares) शेअर्स ५.६ टक्के वाढला. त्याचबरोबर LTIMindtree, टेक महिंद्रा ३.८ टक्के, एचसीएल टेक ३ टक्के आणि इन्फोसिसचा शेअर्स २.६ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, सन फार्मा, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, टायटन, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले. तर टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस हे शेअर्स २.५ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढले.