पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरुवातीच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी (दि. २९) तेजीत बंद झाले. सेन्सेक्स ३६३ अंकांनी वाढून ८०,३६९ वर बंद झाला. तर निफ्टी १२७ अंकांच्या वाढीसह २४,४६६ वर स्थिरावला. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी २४,३०० च्या खाली आला होता. सुरुवातीच्या या घसरणीतून बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली.
क्षेत्रीय पातळीवर बँक, रियल्टी, पॉवर, कॅपिटल गुड्स हे निर्देशांक १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर फार्मा, आयटी आणि ऑटो निर्देशांक ०.५ ते १ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.७ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर्स ५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, बजा फायनान्स, एलटी, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर मारुती आणि टाटा मोटर्सचे शेअर्स प्रत्येकी ४ टक्के घसरून टॉप लूजर्स ठरले. सन फार्मा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इन्फोसिस, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्याने घसरले.
निफ्टी ५० निर्देशांक एसबीआय, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी वाढले. तर मारुती, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डी, सन फार्मा हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांनी घसरले.
आज मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले. बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला घसरणीतून सावरण्यात मदत झाली. कार्पोरेट कंपन्यांचे कमाईबाबतचे अहवाल आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा दबाव आज बाजारावर दिसून आला. पण अखरेच्या तासात बाजारात रिकव्हरी दिसून आली. कच्च्चा तेलाच्या दरातील घसरणीमुळेही बाजाराच्या वाढीला बळ मिळत आहे.