फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजे काय? जाणून घ्या 'या' गुंतवणुकीच्या मॉडेल विषयी....

लहान गुंतवणूकदारांना मोठ्या मालमत्तेत गुंतवणुकीची संधी
Investment Opportunities in Fractional Ownership
फ्रॅक्शनल ओनरशिपमधील गुंतवणुकीतील संधी .Pudhari File Photo
Published on
Updated on
राधिका बिवलकर

फ्रॅक्शनल ओनरशिप पद्धत ही प्रॉपर्टी सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी एक नवीन मॉडेल आहे. या मॉडेलनुसार लहान गुंतवणूकदारांना मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याची तसेच खरेदी करण्याची संधी मिळते. या आधारे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता राहते; मात्र या प्रकारच्या गुंतवणुकीत काही आव्हानेदेखील आहेत.

फ्रॅक्शनल ओनरशिपमधील गुंतवणुकीतील संधी आणि आव्हाने जाणून घेऊ. आपण नेहमीच म्हणतो की, मालकी देणार्‍या मालमत्तेची खरेदी करायला हवी; मात्र फ्रॅक्शनल ओनरशिपचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय रिअल्टी सेक्टरमध्ये ही एक नवीन संकल्पना विकसित असून, त्याला काही प्रमाणातील मालकी म्हणजेच फ्रॅक्शनल ओनरशिप असे म्हणू. फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय, नफा आणि नुकसान काय हे जाणून घ्यायला हवे.

फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजे काय?

अशी मालमत्ता खरेदी करणे की, त्यात गुंतवणूकदाराला पूर्ण मालकी मिळत नाही आणि त्या मालकीत त्याचा आंशिक वाटा असतो. जसे शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करतो, त्याचप्रमाणे या फ्रॅक्शनल ओनरशिप मालमत्तेत वाटा राहतो. रिअल इस्टेटचा विचार केला, तर या माध्यमातून महागड्या आणि उच्च मूल्यांच्या मालमत्तेत गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. आंशिक मालकी असलेली ही व्यवस्था लहान गुंतवणूकदारांसाठी खूपच आकर्षक राहू शकते. या आधारावर कमी भांडवलाच्या जोरावर प्रॉपर्टी बाजारात भागीदार होता येते.

महागडी मालमत्ता खरेदी करता येते

कमी मालकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठमोठी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. यात प्रामुख्याने व्यावसायिक मालमत्ता. या श्रेणीतील मालमत्ता खरेदी करणे महागडे असते. महानगर किंवा मोठ्या शहरांचा विचार केला, तर तेथील किंमती अधिक असतात. अशा वेळी ती मालमत्ता खरेदी करणे लहान गुंतवणूकदारांच्या आटोक्यात नसते. कमी प्रमाणातील मालकीच्या माध्यमातून कोणताही गुंतवणूकदार महागड्या मालमत्तेत गुंतवणूक करून त्यात वाटा मिळवू शकतो. या मालमत्तेतून संभाव्य लाभही मिळतो आणि तेही मोठी गुंतवणूक न करता. गुंतवणुकीचे हे मॉडेल आर्थिकद़ृष्ट्या अनेकांना फायदेशीर ठरत आहे आणि या माध्यमातून महानगरात गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात हे मॉडेल गुंतवणुकीचे उपयुक्त मॉडेल म्हणून समोर येईल.

मालमत्ता देखभालीची चिंता नाही

या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना मालमत्तेच्या देखभालीबाबत काळजी करावी लागत नाही. कमी मालकी देणार्‍या या योजनेनुसार गुंतवणूकदारांना प्रत्यक्षपणे मालमत्तेची देखभाल करण्याची गरज नसते. या मालमत्तेची हाताळणी एखाद्या कंपनीकडून केली जाते. या कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना वेळोवेळी माहिती दिली जाते. मालमत्तेवरून एखादा पेच निर्माण झाला, तर अशा वेळी मालमत्ता व्यवस्थापन पाहणार्‍या कंपन्या सहजपणे त्यावर तोडगा काढतात.

अनिवासी भारतीयांच्या रस

फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजेच आंशिक मालकी असलेल्या मालमत्ता खरेदी करण्यात एनआरआय गुंतवणूकदारांना रस वाढू लागला आहे. यामागचे कारण म्हणजे अनिवासी भारतीयांना कोणत्याही कटकटीविना भारतात गुंतवणुकीची संधी मिळत आहे. मालमत्तेचे व्यवस्थापन कंपन्यांकडून केले जात असल्याने त्यांना भारतात येऊन त्याच्या देखभालीसाठी वेगळी सोय करण्याची आवश्यकता भासत नाही.

संधी आणि आव्हाने

आंशिक मालकी असलेल्या मालमत्तेतील गुंतवणुकीचे अनेक फायदे असले तरी काही आव्हानेदेखील आहेत. यात सर्वात मोठे आव्हान म्हणजे भांडवलातील तरलता. मालमत्तेतील आपला वाटा विकणे हे वाटते तेवढे सोपे नसते. म्हणजे शेअर बाजाराच्या तुलनेत स्थावर मालमत्तेची विक्री करणे सोपे नाही. याशिवाय सहमालकांत मालमत्ता वापरावरून किंवा व्यवस्थापनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी या मॉडेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे. भविष्यातील वाद टाळण्यासाठी सर्व अटी, नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अर्थात फ्रॅक्शनल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदार हा संबंधित मालमत्तेबाबत निश्चिंत राहतो आणि त्याला चांगला परतावा मिळेल, अशी हमी असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही, असा तो विचार करतो; मात्र गुंतवणूकदारांनी या प्रकारच्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून घेतल्या जाणार्‍या निर्णयाची वेळोवेळी माहिती घ्यावी आणि गरज भासल्यास सल्लाही द्यावा. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, गुंतवणूक केली असेल तर फ्रॅक्शनल ओनरशिप मालमत्तेच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मालमत्तेतील उत्पन्नावर नजर

कमी मालकी असणार्‍या मालमत्तेपासून होणार्‍या कमाईवर लक्ष असणे गरजेचे आहे कारण अशा मालमत्ता जादा भाड्याने दिल्या जातात आणि या भाड्यापासून गुंतवणुकीच्या प्रमाणात संबंधितास वाटाही मिळत राहतो. केवळ विक्रीतूनच फायद्यातील वाटा मिळतो, असे नाहीतर भाड्यातूनही कमाई केली जाते. उदा. काहीवेळा फ्रॅक्शनल ओनरशिप मालमत्तेला योग्य किंमत मिळत नसेल, तर अशा वेळी देखभाल करणार्‍या कंपनीमार्फत सर्व गुंतवणूकदारांच्या परवानगीने संबंधित मालमत्ता ही काही दिवस भाड्याने दिली जाते. यापासून काही प्रमाणात उत्पन्न मिळत राहते. याशिवाय मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला विक्रीसाठी आणखी वेळ हवा असेल म्हणजे दोन ते तीन वर्षे थांबण्याची तयारी असेल, तर अशा वेळी तीन वर्षांपर्यंत संबंधित मालमत्ता भाड्याने दिली जाते. याप्रमाणे या आधारे भागीदारांना चांगला परतावा मिळेल. तुम्ही अशा प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक केली असेल, तर त्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीचे आकर्षक मॉडेल

मालमत्तेवरील आंशिक मालकीची पद्धत ही भारतीय रिअल इस्टेटमध्ये नवीन आणि आकर्षक ठरणारे मॉडेल असून, ते आगामी काळात लोकप्रिय होऊ शकते. या प्रकारचे मॉडेल गुंतवणूकदारांना मोठ्या मालमत्तेच्या बाजारात प्रवेश करण्याचा एक सुलभ मार्ग असण्याबरोबरच प्रभावी माध्यमदेखील ठरणार आहे. भारतातील रिअल इस्टेटच्या वाढत्या बाजाराशी ग्राहकांना सुसंगत ठेवण्याचे काम फ्रॅक्शनल ओनरशिप मॉडेल करते. अशा वेळी तुम्हीही या पर्यायाचा विचार करत असाल, तर हे मॉडेल नक्कीच फायदेशीर राहू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news