पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क अर्थात टॅरिफबाबत घेतलेली नरमाईची भूमिका, कमकुवत डॉलर आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आदी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचा वारु उधळला. मंगळवारी (दि.१५) देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी २ टक्के वाढ नोंदवली. सेन्सेक्स १,५७७ अंकांनी वाढून ७६,७३४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५०० अंकांनी वाढून २२,३२८ वर स्थिरावला. आजच्या सत्रात रियल्टी, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली.
निफ्टी रियल्टी ५.६ टक्के वाढला. तर संभाव्य टॅरिफमधून सूट मिळण्याच्या आशेने आज निफ्टी ऑटो निर्देशांक ३.४ टक्के वाढला. निफ्टी बँक २.७ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप २.१ टक्के आणि स्मॉलकॅप ३ टक्के वाढला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १५ एप्रिल रोजी १०.७४ लाख कोटींनी वाढून ४१२.२९ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या शुक्रवारी बाजार भांडवल ४०१.५५ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १०.७४ लाख कोटींची वाढ झाली.
सेन्सेक्सवर इंडसइंड बँकेचा शेअर्स ६.८ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. टाटा मोटर्स आणि एलटी शेअर्स प्रत्येकी ४.५ टक्के वाढले. ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, एम अँड एम, बजाज फायनान्स, Eternal, भारती एअरटेल, टाटा स्टील, मारुती हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले.
या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेने स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना त्यांच्या नियोजित परस्पर शुल्कातून वगळले. या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारांत तेजीचा माहौल तयार झाला. याचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारानेही मोठी उसळी घेतली.
अमेरिकेतील डॉलर निर्देशांक घसरला आहे. या पार्श्वभूमीवर विशेषतः भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमधील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. डॉलर कमकुवत झाल्याने भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढून रुपयावरील दबाव कमी होते, असे बाजारातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळेही बाजाराला उभारी मिळाली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ६५ डॉलरच्या खाली आल्या. यामुळे महागाईची चिंता काही प्रमाणात निवळली.