Stock Market Updates ‍BSE Sensex
सेन्सेक्स ५६८ अंकांच्या वाढीसह ७९,२४३ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर बंद! 'या' स्टॉक्सची कमाल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

परदेशी गुंतवणूकदारांचा वाढलेला ओघ आणि हेवीवेट शेअर्समधील खरेदीच्या जोरावर गुरुवारी (दि.२७) भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी तेजी अनुभवली. तर सलग तिसऱ्या दिवशी तेजीची हॅट्ट्रिक केली. विशेष म्हणजे निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २४ हजारांचा टप्पा पार केला. तर सेन्सेक्सने ७०० अंकांच्या वाढीसह ७९,३९६ चा सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स ५६८ अंकांच्या वाढीसह ७९,२४३ वर बंद झाला. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून २४,०४४ वर स्थिरावला. आज IT शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

बाजारात आज काय घडलं?

  • हेवीवेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी.

  • IT, सिमेंट स्टॉक्समध्ये तुफान तेजी.

  • सेन्सेक्स ५६८ अंकांच्या वाढीसह ७९,२४३ वर बंद झाला.

  • निफ्टी १७५ अंकांनी वाढून २४,०४४ वर स्थिरावला.

  • बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद.

  • स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला.

क्षेत्रीय आघाडीवर काय स्थिती?

क्षेत्रीय आघाडीवर आयटी आणि पॉवर निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने वाढले, तर रियल्टी आणि पीएसयू बँक निर्देशांक ०.७ ते १ टक्क्याने घसरले. बँका, एफएमसीजी, मेटल आणि फार्मामध्येही खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदार मालामाल, १.८१ लाख कोटींचा फायदा

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २७ जून रोजी ४३८.८३ लाख कोटींवर पोहोचले. जे याआधीच्या २६ जून रोजीच्या सत्रात ४३७.०२ लाख कोटी होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.८१ लाख कोटींची वाढ झाली.

निफ्टी २४ हजारांवर

निफ्टीने आज २४,०८७ चा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, LTIMindtree, एनटीपीसी, विप्रो, बीपीसीएल हे टॉप गेनर्स राहिले. तर एलटी, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स, डिव्हिस लॅब हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० चा ट्रेडिंग आलेख.

कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्स आज ७८,७५८ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७९,३९६ चा उच्चांक गाठला. सेन्सेक्सवर अल्ट्राटेकचा शेअर्स ५ टक्के वाढीसह टॉप गेनर ठरला. त्यासोबतच एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, कोटक बँक, टीसीएस, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एम अँड, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, रिलायन्स, टाटा स्टील, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एलटी, एचडीएफसीमध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

सेन्सेक्सने ७०० अंकांच्या वाढीसह ७९,३९६ चा सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला.

अल्ट्राटेक सिमेंट शेअर्स तुफान तेजीत

अल्ट्राटेक सिमेंट शेअर्समध्ये आज जोरदार तेजी राहिली. अल्ट्राटेक सिमेंटने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की. अल्ट्राटेक सिमेंट हे इंडिया सिमेंट (India Cements) मधील सुमारे २३ टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहे. हा व्यवहार एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या वृत्तामुळे बीएसई सेन्सेक्सवर अल्ट्राटेकचा शेअर्स ११,८७५ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो सुमारे ५ टक्के वाढीसह ११,७०० च्या पातळीवर स्थिरावला.

जागतिक बाजार

बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक किरकोळ वाढले. Amazon.com Inc ने जनरेटिव्ह AI मध्ये प्रवेश जाहीर केल्याने बाजारातील निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. जपानचा निक्केई १ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँग सेंग देखील २ टक्क्यांनी घसरला.

SCROLL FOR NEXT