Nvidia : संपूर्ण जगात वाजतोय या कंपनीचा डंका

एनव्हिडियाची भरारी
Nvidia Worlds Largest Company
एनव्हिडियाने मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देत पहिले स्थान पटकावले. Pudhari File Photo
हेमचंद्र फडके

शेअर बाजारात नोंदणीकृत असणार्‍या कंपन्यांचे बाजारमूल्य आणि त्यानुसार एकूण बाजार भांडवल हे त्या कंपनीच्या समभागांमध्ये आलेल्या तेजी-मंदीवर अवलंबून असते. खरेदीदारांचा ओघ वाढला आणि समभागांची किंमत वधारली, तर कंपनीचे बाजार भांडवल वाढते. याउलट कंपनीच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ लागली आणि त्यामुळे भाव गडगडले, तर बाजार भांडवलात घट होते. भारतीय शेअर बाजारामध्ये कोव्हिड महामारीची सुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाला तेव्हा जी सर्वात मोठी पडझड झाली होती, त्यावेळी ज्या चाणाक्ष गुंतवणूकदारांनी खरेदीची संधी साधली ते आज लखपती-करोडपती बनले आहेत. अवघ्या चार वर्षांमध्ये अनेक कंपन्यांच्या समभागांमध्ये किमान 50 टक्क्यांपासून ते अगदी 1000 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देत पहिले स्थान

आज भारतीय शेअर बाजार सर्वोच्च शिखरावर असल्याने अनेक कंपन्यांचे मार्केट कॅप किंवा बाजार भांडवल विक्रमी पातळीवर आहे. ही प्रक्रिया जगभरातील शेअर बाजारात घडत असते; पण अमेरिकेतील एका कंपनीच्या मार्केट कॅपने महाविक्रम प्रस्थापित केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तेजीमुळे चीप बनवणार्‍या एनव्हिडिया या कंपनीने वर्षानुवर्षे अमेरिकन शेअर बाजारात अव्वल स्थानावर असणार्‍या मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देत पहिले स्थान पटकावले आहे. या चीप निर्मात्या कंपनीचे समभाग सरत्या आठवड्यात 3.2 टक्क्यांनी वाढून त्यांचा भाव 135.21 डॉलरवर पोहोचला आणि कंपनीचे बाजार भांडवल 3.326 ट्रिलियन डॉलरवर नेले.

अ‍ॅपलला मागे टाकून एनव्हिडियाने पटकावले दुसरे स्थान

काही दिवसांपूर्वीच आयफोन उत्पादक कंपनी अ‍ॅपलला मागे टाकून एनव्हिडियाने दुसरे स्थान पटकावले होते. कंपनीचे बाजारमूल्य केवळ नऊ महिन्यांत 1 ट्रिलियन डॉलरवरून 2 ट्रिलियन डॉलर झाले आणि जूनमध्ये 3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ तीन महिने लागले. एनव्हिडियाच्या या विक्रमी उसळीमुळे नॅसडॅक कम्पोझिट इंडेसने यावर्षी आतापर्यंत 20 टक्क्यांहून अधिक वृद्धी दर्शवली आहे. त्या तुलनेत एमएससीआय जागतिक निर्देशांक सुमारे 10 टक्क्यांनी वाढला आहे, तर निफ्टी 8 टक्क्यांनी वाढला आहे.

बाजार भांडवलामध्ये आठ महिन्यांत 2.3 ट्रिलियनची वाढ

चालू वर्षी आतापर्यंत जवळपास 180 टक्क्यांनी एनव्हिडियाचे समभाग वधारले आहेत, तर त्या तुलनेत मायक्रोसॉफ्टचे शेअर्स जवळपास 19 टक्क्यांनी वाढले आहेत. एनव्हिडियाचे एकूण बाजारभांडवल किती महाप्रचंड बनले आहे, हे खालील मुद्द्यांवरून लक्षात येईल.

* जगातील सात देश वगळता इतर सर्व देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त

* संपूर्ण क्रिप्टो मार्केटपेक्षाही अधिक

* एलोन मस्क यांच्या ‘टेस्ला’ या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीच्या मार्केटकॅपपेक्षा पाचपटींनी अधिक आहे.

* कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी असणार्‍या वॉलमार्टच्या मार्केट कॅपपेक्षा सहा पटीने जास्त

* फ्रान्सच्या शेअर बाजारापेक्षाही अधिक

* जगप्रसिद्ध अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या अ‍ॅमेझॉन आणि वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे यांच्या एकत्रित मार्केट कॅपइतके

* लॉस एंजेलिसच्या जीडीपीच्या तिप्पट

* जगातील आघाडीच्या 12 अब्जाधीशांच्या एकत्रित निव्वळ संपत्तीएवढे

* अमेरिकेतील तेल आणि वायू उद्योगापेक्षाही अधिक.

* इतकी महाप्रचंड कमाई करणार्‍या एनव्हिडियाच्या बाजार भांडवलामध्ये ऑक्टोबर 2023 पासून म्हणजेच अवघ्या आठ महिन्यांत 2.3 ट्रिलियनची वाढ झाली आहे.

* चार वर्षांपूर्वीपर्यंत एनव्हिडियाचा जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये समावेशही नव्हता.

1999 मध्ये कंपनीचे शेअर्स सार्वजनिक झाल्यापासून आतापर्यंत ते 591,078 टक्क्यांनी वाढले आहेत.

याचाच अर्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या समभागांमध्ये 1999 मध्ये 10,000 ची गुंतवणूक केली असती; तर आज त्याचे मूल्य 59,107,800 झाले असते. ही गुंतवणूक जर दोन लाख रुपये असती, तर सदर व्यक्ती आज 25 वर्षांनी अब्जाधीश बनली असती.

एनव्हिडियाने चार महिन्यांपूर्वी रचला होता नवा विक्रम

एनव्हिडिया या कंपनीने चार महिन्यांपूर्वी असाच एक नवा विक्रम रचला होता. फेब्रुवारी महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल 16 टक्क्यांची वाढ झाली होती. शेअर्सचे हे मूल्य वाढल्यामुळे एनव्हिडिया कंपनीचे बाजार भांडवल एका दिवसात 277 अब्ज डॉलर्सने वाढले होते. एनव्हिडियाची तुलना आपण भारतीय बाजारातील समभागांशी केल्यास हे चित्र अधिक स्पष्ट होईल. भारतातील रिलायन्स इंडस्ट्री ही कंपनी निफ्टी 50 मधील सर्वाधिक वेटेज असणारी कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ती जगात 46 व्या स्थानी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 236.71 अब्ज डॉलर्स म्हणजेच 19.75 ट्रिलियन रुपये आहे. म्हणजेच रिलायन्सपेक्षा दहा पटींनी अधिक एनव्हिडियाचे बाजार भांडवल आहे. यावरून ही कंपनी किती श्रीमंत बनली आहे, याची कल्पना येईल.

जगातील सर्वात मौल्यवान सेमीकंडटर फर्म

जगातील सर्वात मौल्यवान सेमीकंडटर फर्म म्हणून नावारूपाला आलेल्या या कंपनीची भारतात हैदराबाद, पुणे, गुरुग्राम आणि बेंगळुरू या चार शहरांत अभियांत्रिकी विकास केंद्रे आहेत. जीपीयू म्हणजेच ग्राफिस प्रोसेसिंग युनिट्सच्या डिझाईनसाठी आणि निर्मितीसाठी या कंपनीची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. जेन्सेन हुआंग, कर्टिस प्रीम आणि ख्रिस मालाचोव्स्की हे या कंपनीचे संस्थापक होते. यापैकी जेन्सेन हुआंग हे मूळचे तैवानमधील आहेत. त्यांचे लहानपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. 1973 मध्ये त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अमेरिकेतील त्यांच्या नातेवाइकांकडे पाठवले.1984 मध्ये ओरेगॅन विद्यापीठात ते शिक्षणासाठी दाखल झाले. त्यांनी येथून इलेट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यांनी 1992 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदविका मिळवली. तिथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एप्रिल 1993 मध्ये एनव्हिडियाची स्थापना केली. व्हिडिओ गेम, ग्राफिस चिप्स तयार करण्याचे काम करत होती. कंपनीचे समभाग 100 डॉलरवर पोहोचले तेव्हा जेनसन यांनी त्यांच्या दंडावर कंपनीचा लोगो टॅटू करून घेतला होता. वास्तविक, त्यांचा इथवरचा प्रवास हा संघर्षमयही राहिला. एनव्हिडियाची सुरुवात होण्यापूर्वी जेन्सेन हुआंग यांना शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी काही महिने रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करावे लागले. या नोकरीदरम्यान त्यांना कधी टॉयलेट स्वच्छ करावे लागले, तर कधी दुसर्‍याचे कपडेही त्यांनी धुतले. आज ते जगातील अब्जाधीशांच्या पंक्तीत समाविष्ट झाले आहेत. सध्या या कंपनीच्या समभागांमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या एनव्हिडियाकडून प्रचंड प्रमाणात चीप खरेदी करत आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिरातीकडूनही चीप खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतकेच नव्हे, तर टेन्सेट आणि अलिबाबा या चीनी कंपन्याही एनव्हिडियाच्या दरवाजावर आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news