पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मंगळवारी (दि.२८) दमदार तेजी दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,१०० अंकांची वाढ नोंदवून ७६,५१२ वर पोहोचला होता. पण त्यानंतर तो इंट्राडे उच्चांकावरून ६१२ अंकांनी खाली आला. सेन्सेक्स आज ५३५ अंकांच्या वाढीसह ७५,९०१ वर स्थिरावला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२८ अंकांनी वाढून २२,९५७ वर बंद झाला. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग व्यवस्थेत तरलता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात ओपन मार्केट ऑपरेशन्सचाही (OMO) समावेश आहे. त्याअंतर्गत ३० जानेवारी, १३ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी २०२५ अशा तीन टप्प्यांत ६० हजार कोटींच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे फेब्रुवारीमध्ये आरबीआयकडून व्याजदर कपातीची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
निफ्टी बँक निर्देशांक १.६ टक्के वाढला. निफ्टी बँकवर पीएनबी, AU Small Finance Bank हे शेअर्स प्रत्येकी ४.५ टक्के वाढले. तर ॲक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्सही २.६ ते ३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.९ टक्के वाढला. Cholamandalam, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स हे फायनान्सियल शेअर्स तेजीत राहिले.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, झोमॅटो, भारती एअरटेल हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर सन फार्मा, एलटी, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, आयटीसी, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले.
चीनच्या नवीन एआय मॉडेल 'डीपसीक'मुळे जागतिक बाजारपेठेत हाहाकार उडाला आहे. विशेषतः अमेरिकेतील शेअर बाजारात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पण भारतीय शेअर बाजारात त्याचा तितका प्रभाव दिसून आला नाही. पण आज ब्रॉडर मार्केटमध्ये आजही घसरण कायम राहिली. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मिळणारा नफा मर्यादित राहिला.
चीनचे एआय स्टार्टअप डीपसीक-आर१ ने (DeepSeek-R1) एक स्वस्त एआय मॉडेल आल्याचे पडसाद २७ जानेवारी रोजी अमेरिकेतील शेअर बाजारातही उमटले. परिणामी सोमवारी, अमेरिकन चीप मेकर कंपनी एनव्हीडिया कॉर्पचे शेअर्स धडाधड कोसळले. एस अँड पी 500 निर्देशांक १.५ टक्के आणि नॅस्डॅक निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरला.