पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या भीतीने आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) २०२ अंकांनी घसरून ८२,३५२ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ८१ अंकांच्या घसरणीसह २५,१९८ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
सेन्सेक्स २०२ अंकांनी घसरून ८२,३५२ वर बंद.
निफ्टी ८१ अंकांच्या घसरणीसह २५,१९८ वर स्थिरावला.
बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण.
एफएमसीजी, रियल्टी आणि फार्मा निर्देशांकात वाढ.
निफ्टी आयटी सुमारे १ टक्के घसरला.
अमेरिकेतील संभाव्य मंदी आणि तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला. याचे पडसाद आज आशियासह भारतीय शेअर बाजारातही (Stock Market Crash) उमटले. भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीच्या व्यवहारात ५५० अंकांनी घसरून ८२ हजारांच्या खाली आला होता. तर निफ्टी (Nifty) १७० अंकांनी घसरून २५,१०० पर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकात रिकव्हरी केली. आजच्या बाजारातील कमकुवत वातावरणात गुंतवणूकदारांची बचावात्मक भूमिका दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकात एफएमसीजी, रियल्टी आणि फार्मा प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर ऑटो, बँक, एनर्जी, आयटी, मेटल ०.४ ते १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांकात किरकोळ घसरण दिसून आली. तर स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला.
सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक, एम अँड एम, इन्फोसिस, एलटी, टाटा स्टील, टीसीएस हे शेअर्स घसरले. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, रिलायन्स हे शेअर्स वाढून बंद झाले.
निफ्टीवर विप्रो, कोल इंडिया, ओएनजीसी, हिंदाल्को, LTIMindtree हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर एशियन पेंट्स, ग्रासीम, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीच्या चिंतेमुळे निफ्टी आयटी सुमारे १ टक्के घसरला. कारण भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेतून मोठे उत्पन्न मिळते. निफ्टी आयटीवर टेक महिंद्रा, विप्रो, Mphasis, LTIMindtree आणि Coforge हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.