Stock Market BSE Sensex
आज सेन्सेक्स १,२९२ अंकांनी वाढून ८१,३३२ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | जोरदार कमबॅक! सेन्सेक्स १,२९२ अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांची ७ लाख कोटींची कमाई

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

गेल्या पाच सत्रांतील घसरणीतून सावरत भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि. २६) मोठी झेप घेतली. आज सर्व क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) १,२९२ अंकांनी वाढून ८१,३३२ वर बंद झाला. तर निफ्टीने (Nifty) आजच्या ट्रेडिंग सत्राच्या क्षेवटच्या काही मिनिटांत २४,८६१ चा नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी ४२८ अंकांच्या वाढीसह २४,८३४ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ ही अनुक्रमे १.६ टक्के आणि १.७ टक्के एवढी राहिली. आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला मोठा सपोर्ट मिळाला. (Stock Market Closing Bell)

ठळक मुद्दे

  • पाच सत्रांतील घसरणीतून सावरत शेअर बाजाराचे जोरदार कमबॅक

  • सेन्सेक्स १,२९२ अंकांनी वाढून ८१,३३२ वर बंद.

  • निफ्टी ४२८ अंकांच्या वाढीसह २४,८३४ वर स्थिरावला.

  • आयटी शेअर्समधील तेजीचा बाजाराला मिळाला मोठा सपोर्ट.

  • आज २,३२४ शेअर्स वाढले, तर १,११३ शेअर्समध्ये घसरण.

  • बीएसई मिडकॅप २ टक्क्यांनी, स्मॉलकॅप १ टक्के वाढून बंद.

गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फायदा

बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.१६ लाख कोटींनी वाढून ४५६.९८ लाख कोटींवर पोहोचले. आज २,३२४ शेअर्स वाढले. तर १,११३ शेअर्समध्ये घसरण झाली. ७५ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

निफ्टी मेटलची कामगिरी चांगली

क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी मेटलची कामगिरी चांगली राहिली. हा निर्देशांक सुमारे ३ टक्क्यांनी वाढला. निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी आयटी आज सुमारे २ टक्क्यांनी वाढले.

निफ्टीचा नवा उच्चांक

सेन्सेक्स आज ८०,१५८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ८१,३३२ वर बंद झाला. सेन्सेक्सवरील ३० पैकी २९ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. तर केवळ नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, एचसीएल टेक, एम अँड एम, आयटीसी, टाटा मोटर्स, टायटन, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले. बीएसई मिडकॅप २ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप १ टक्के वाढून बंद झाला.

सेन्सेक्सवरील ३० पैकी २९ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले.

श्रीराम फायनान्सचा शेअर्स टॉप गेनर

निफ्टीवर श्रीराम फायनान्स, सिप्ला, डिव्हिस लॅब, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स आज टॉप गेनर्स राहिले. श्रीराम फायनान्सचा शेअर्स ९ टक्क्यांनी वाढून बंद झाला. सिप्ला, डिव्हिस लॅबचा शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढला. तर ओएनजीसी, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्राच्या क्षेवटच्या काही मिनिटांत २४,८६१ चा नवा उच्चांक नोंदवला.

बाजारातील तेजीचे कारण काय?

गुंतवणूकदारांनी बजेटमधील भांडवली नफा कर वाढीच्या पलीकडे जाऊन कंपन्यांच्या तिमाही कमाईच्या आकडेवारीकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यात फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल या अपेक्षेने दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आयटी शेअर्स वधारले असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण आयटी कंपन्या अमेरिकेतून मोठा महसूल मिळवतात.

SCROLL FOR NEXT