Stock Market Sensex Nifty
बीएसई आणि एनएसई. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट, कोणते शेअर्स चमकले?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

नव्या विक्रमी उच्चांकावर खुला झालेला शेअर बाजार मंगळवारी (दि.२ जुलै) सपाट पातळीर बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) ३४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,४४१ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १८ अंकांनी घसरून २४,१२३ वर स्थिरावला. विशेष म्हणजे आयटी कंपन्यांचे शेअर्स आज सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात तेजीत राहिले.

देशांतर्गत शेअर बाजाराने आज सुरुवातीला नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता. सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर खुले झाले होते. पण त्यानंतर त्यात घसरण झाली आणि ते सपाट पातळीवर बंद झाले.

बाजारातील ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स ३४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,४४१ वर बंद.

  • निफ्टी १८ अंकांनी घसरून २४,१२३ वर स्थिरावला.

  • आयटी शेअर्स सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात तेजीत.

  • बीएसई मिडकॅप ०.५ टक्क्यांनी घसरला.

  • स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद.

  • बँकिंग शेअर्समध्ये घसरण

क्षेत्रीय आघाडीवर काय स्थिती?

दरम्यान, क्षेत्रीय निर्देशांकात कॅपिटल गुड्स, आयटी, रियल्टी, ऑईल आणि गॅस ०.३ ते १ टक्के वाढले. तर बँक, ऑटो, FMCG, पॉवरमध्ये घसरण झाली. बीएसई मिडकॅप ०.५ टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

कोणते शेअर्स सर्वाधिक वाढले?

सेन्सेक्स आज ३६४ अंकांच्या वाढीसह ७९,८४० वर खुला झाला होता. आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान त्याने ७९,८५५ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर तो ७९,५०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एलटी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर भारती एअरटेल, कोटक बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्सवरील शेअर्स.

तर निफ्टी ५० निर्देशांक ८७ अंकांनी वाढून २४,२२८ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २४,२३६ पर्यंत वाढ नोंदवली. निफ्टीवर एलटी, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एसबीआय, कोटक बँक हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

निफ्टी ५० वरील ट्रेडिंग आलेख.

IT शेअर्स तेजीत, कारण काय?

आयटी शेअर्सनी मागील सत्रात २ टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. आज पुन्हा आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदर कपात करेल, या शक्यतेने आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. निफ्टी आयटी आज १ टक्क्यांनी वाढला. निफ्टी आयटीवर Coforge चा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढला. त्याचबरोबर विप्रो, इन्फोसिस हे शेअर्सही प्रत्येकी जवळपास २ टक्क्यांनी वाढले.

बँकिंग शेअर्सवर विक्रीचा दबाव

बँकिंग शेअर्सवर आज विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी बँकवर बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, एसबीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर एचडीएफसी बँकेचा शेअर्स १ टक्के वाढला.

SCROLL FOR NEXT