Sebi  (File photo)
अर्थभान

Sebi Bans Jane Street | भारतीय शेअर बाजारात खळबळ, USच्या 'या' ट्रेडिंग कंपनीनं फेरफार करुन कमावलं ४,८४३ कोटी, 'सेबी'नं घातली बंदी

अमेरिकेच्या एका कंपनीने भारतीय शेअर बाजारांत फेरफार करून ४,८४३ कोटी रुपये कमावले असल्याचे आढळून आल्यानंतर सेबीने मोठी कारवाई केली आहे

दीपक दि. भांदिगरे

Sebi Bans Jane Street

भांडवली बाजार नियामक असलेल्या 'सेबी'ने (SEBI) ने अमेरिकेच्या जेन स्ट्रीट ग्रुपवर भारतीय शेअर बाजारात कोणतेही ट्रेडिंग करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की या अमेरिकेच्या या ट्रेडिंग ग्रुपमधील कंपन्या भारतीय शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु शकणार नाहीत. याबाबत सेबीने अंतरिम आदेश पारित केला आहे.

१०५ पानांच्या अंतरिम आदेशात सेबीने म्हटले आहे की, कथित बेकायदेशीररित्या कमावलेले ४,८४० कोटी रुपये जप्त केले जातील आणि बँकांना जेन स्ट्रीटशी संबंधित खात्यांमधून परवानगीशिवाय पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत.

जेन स्ट्रीट ग्रुपच्या कंपन्यांनी भारतीय शेअर बाजारांत फेरफार करून ४,८४३ कोटी रुपये कमावले असल्याचे सेबीने म्हटले आहे. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करुन मिळवलेले हे पैसे सदर ग्रुपला परत करावे लागतील. त्यांना हे पैसे एस्क्रो खात्यात जमा करावे लागतील, असा सेबीने अंतरिम आदेशात म्हटले आहे.

सेबीकडे आल्या अनेक तक्रारी

सेबीकडे जेन स्ट्रीट कंपन्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यानच्या काळात जेन स्ट्रीट ग्रुपने भारतीय शेअर बाजारात हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग रणनीतीचा वापर केल्याचे दिसून आले. अशी पद्धतीने त्यांनी ४,८४३ कोटी रुपयांचा नफा कमावला. जेन स्ट्रीटने भारतीय शेअर बाजारात बेकायदेशीर आणि फेरफार करत नफा कमावला, असे सेबीचे म्हणणे आहे.

४५ हून अधिक देशांमध्ये करतात ट्रेंडिंग

जेन स्ट्रीट ग्रुप ही एक ग्लोबल प्रॉपरायटरी ट्रेडिंग फर्म आहे. ही फर्म तिच्या उपकंपन्यांद्वारे जगातील ४५ हून अधिक देशांमध्ये ट्रेंडिंग करते. अमेरिका, युरोप आणि आशियात त्यांची पाच ठिकाणी कार्यालये आहेत. यात २,६०० हून अधिक लोक काम करतात. हा ग्रुप शेअर बाजारात मोठा नफा कमवण्याच्या उद्देशाने अल्गोरिदम आधारित रणनीतीचा वापर करत होते.

तीन कंपन्यांद्वारे चालते कामकाज

भारतातील जेन स्ट्रीटचे कामकाज तीन नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांमार्फत (FPIs) चालते. त्यात जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग लिमिटेड (JSATL), जेन स्ट्रीट इंडिया ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (JSITPL) आणि जेन स्ट्रीट एशिया एलएलसी (JSALLC) यांचा समावेश आहे.

नफा कमावण्यासाठी कोणत्या रणनीतीचा वापर

सेबीला असे आढळून आले की या कंपन्या नियमितपणे इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जमध्ये विरुद्ध भूमिका घेत होत्या. विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये त्यांची अशी रणनिती राहिली. एक जेन स्ट्रीट कंपनी खरेदी करायची आणि दुसरी कंपनी त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये एकाच किमतीला एकाचवेळी विक्री करत होती. ही ट्रेडिंग रणनीती बहुतांश वेळा मंथली आणि विकली एक्स्पायरीच्या दिवशी अवलंबली होती, असे सेबीला दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT