RBI E-Mandate Update: भारतात डिजिटल पेमेंट्स अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ई-मँडेट (auto-debit) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार आता ठराविक मर्यादेपर्यंतच्या पेमेंटसाठी वारंवार OTP टाकण्याची गरज नाही.
आतापर्यंत Netflix, वीज बिल, मोबाइल रिचार्ज, EMI यांसारख्या ऑटो-डेबिट व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी OTP टाकावा लागत होता. पण आता ग्राहकांनी एकदाच OTP देऊन ई-मँडेट नोंदणी केली की, त्यानंतर ₹15,000 पर्यंतची सर्व पेमेंट्स आपोआप होतील. म्हणजेच, दरवेळी वेगळा OTP देण्याची गरज नाही.
मात्र, ₹15,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी OTP आवश्यक राहणार आहे. या नियमांमध्ये काही विशेष सवलतीही देण्यात आल्या आहेत. विमा हप्ता, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड बिल यांसारख्या महत्त्वाच्या पेमेंटसाठी ही मर्यादा ₹1 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, त्यासाठीही ई-मँडेट आधी करावे लागणार आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आरबीआयने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. प्रत्येक ऑटो-डेबिटपूर्वी किमान 24 तास आधी ग्राहकांना SMS किंवा ईमेलद्वारे सूचना मिळेल. यात व्यवहाराची रक्कम, तारीख आणि कोणत्या सेवेसाठी पैसे कापले जाणार आहेत याची माहिती दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांना चुकीचा व्यवहार असल्यास तो आधीच थांबवण्याची संधी मिळेल.
तसेच, ग्राहकांना त्यांच्या ई-मँडेटमध्ये बदल करण्याची, ते थांबवण्याची किंवा पूर्णपणे रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अनधिकृत व्यवहार झाल्यास ‘झिरो लायबिलिटी’ धोरण लागू राहील, म्हणजे वेळेत तक्रार केल्यास ग्राहकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही. एकूणच, या नव्या नियमांमुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सोपे, जलद आणि सोयीचे होणार आहेत. त्याचबरोबर, ग्राहकांच्या सुरक्षेलाही महत्त्व देण्यात आलं आहे.