Paytm Share Crash Pudhari
अर्थभान

Paytm Share Crash: RBIच्या एका निर्णयाने Paytm हादरलं! काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5,800 कोटी रुपये बुडाले

Paytm Share Crash: भारतीय रिझर्व्ह बँकेने Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर Paytm च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

पुढारी वृत्तसेवा

Paytm Share Crash: भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे Paytm च्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. काही मिनिटांतच कंपनीच्या गुंतवणूकदारांचे तब्बल 5,800 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. RBI ने Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर बाजारात मोठी खळबळ उडाली.

24 एप्रिल रोजी बाजार बंद झाल्यानंतर RBI ने Paytm Payments Bank चा परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचा थेट परिणाम सोमवारी शेअर बाजार उघडताच दिसून आला. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच पेटीएमचा शेअर जवळपास 8 टक्क्यांनी कोसळला.

कंपनीचा शेअर 1147 रुपयांवरून घसरत 1055 रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली. बीएसईवर कंपनीचे बाजारमूल्य घसरून सुमारे 67,546 कोटी रुपयांवर आले. अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे सुमारे 5,879 कोटी रुपये बुडाल्याचं चित्र दिसून आलं.

RBI ने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, बँकेचं कामकाज हे ग्राहक आणि ठेवीदारांच्या हिताविरोधात चालवलं जात होतं. यापूर्वीही मार्च 2022 मध्ये RBI ने Paytm Payments Bank ला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये ग्राहक खात्यांमध्ये नवीन जमा आणि क्रेडिट व्यवहारांवरही कठोर निर्बंध घालण्यात आले होते.

दरम्यान, Paytm ने शेअर बाजाराला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, RBI च्या या कारवाईचा कंपनीच्या मुख्य व्यवसायावर थेट परिणाम होणार नाही. तरीही गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

RBI च्या आदेशानुसार आता Paytm Payments Bank ला कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी केंद्रीय बँक उच्च न्यायालयात जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही कारवाई भारतीय बँकिंग क्षेत्रातील पेमेंट बँकेविरोधातील सर्वात कठोर कारवाईंपैकी एक मानली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस Paytm च्या शेअर्सवर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT