Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळू शकतो. पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर सध्या लागू असलेल्या 7.5 टक्के व्याजदरानुसार तुमच्या गुंतवणुकीवर 2,24,974 रुपये व्याज जमा होते. त्यामुळे पाच लाख रुपयांच्या ठेवीवर मुदतपूर्तीनंतर थेट 7,24,974 रुपये मिळतात. म्हणजे केवळ व्याजातूनच गुंतवणूकदारांना लाखोंचा फायदा होतो.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना ही पूर्णपणे सुरक्षित आणि जोखीममुक्त आहे. तिच्यामागे भारत सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूकदारांना चिंता करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, या योजनेतील पाच वर्षांच्या ठेवीवर इनकम टॅक्स अॅक्ट 1961 मधील कलम 80C अंतर्गत करसवलतीचाही लाभ मिळतो.
या योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करून खाते उघडता येते. गुंतवणुकीची मर्यादा नाही. सिंगल किंवा जॉइंट दोन्ही प्रकारची खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते देखील पालकांच्या नावावरून उघडता येते. गुंतवणुकीवर मिळणारे व्याज दरवर्षी खात्यात जमा होते.
टाइम डिपॉझिट खाते उघडण्यासाठी फक्त ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्टसाइज फोटो इतकी कागदपत्रे पुरेशी असतात. जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरल्यानंतर खाते लगेच सुरू केले जाऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या देशभरात शाखा असल्यामुळे ही योजना ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागातही सहज उपलब्ध आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना सुरक्षित आहे, स्थिर व्याजदर देणारी आहे, करसवलत आणि सोपी प्रक्रिया आहे. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठी हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.