Pizza Hut Sale: जगभरातील पिझ्झा प्रेमींसाठी परिचित असलेला Pizza Hut हा प्रसिद्ध ब्रँड आता नव्या मालकांच्या ताब्यात जाणार आहे. अवघ्या काही हजार रुपयांच्या उधारीतून सुरू झालेला हा व्यवसाय आज तब्बल 22,500 कोटी रुपयांच्या डीलचा भाग झाला आहे.
Pizza Hut ची मूळ कंपनी असलेल्या Yum Brands ने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत Pizza Hut च्या व्यवसायाची विक्री करण्यात आली आहे. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 2.7 अब्ज डॉलर (सुमारे 22,500 कोटी रुपये) इतकी आहे.
या करारानुसार Long Range Capital ही प्रायव्हेट इक्विटी कंपनी Pizza Hut च्या जागतिक व्यवसायातील मोठा हिस्सा 1.5 अब्ज डॉलरमध्ये विकत घेणार आहे. तर Yum China Holdings ही चीनमधील कंपनी Pizza Hut व्यवसायासाठी 1.2 अब्ज डॉलर मोजणार आहे. नियामक मंजुरीनंतर हा व्यवहार 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत रेस्टॉरंट उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. वाढती महागाई, ग्राहकांच्या खर्चात झालेली घट, वाढती स्पर्धा आणि काही बाजारपेठांतील विक्रीतील घसरण यामुळे अनेक मोठ्या ब्रँड्सना नव्याने रणनीती आखावी लागत आहे.
Pizza Hut ची विक्रीही याच पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. Yum Brands च्या मते, या व्यवहारामुळे कंपनीला तिच्या वेगाने वाढणाऱ्या इतर ब्रँड्सवर अधिक लक्ष देता येणार आहे.
आजही Pizza Hut ही अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पिझ्झा चेन मानली जाते. पहिल्या क्रमांकावर Domino's असून Pizza Hut चे अमेरिकेत जवळपास 6,300 स्टोअर्स आहेत. गेल्या वर्षी कंपनीची देशांतर्गत विक्री 5.1 अब्ज डॉलर इतकी होती.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेतील विक्रीत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कंपनीने यावर्षी तोट्यात चालणारी जवळपास 250 स्टोअर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pizza Hut ची कथा अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. 1958 मध्ये फ्रँक कार्नी आणि डॅन कार्नी या दोन भावांनी अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात पहिले Pizza Hut आउटलेट सुरू केले होते.
यासाठी त्यांनी आपल्या आईकडून 600 डॉलर उधार घेतले होते. त्या काळातील डॉलरच्या किंमतीनुसार ही रक्कम साधारण 12 ते 13 हजार रुपये इतकी होती. सुरुवातीला जागेची कमतरता असल्यामुळे त्यांनी टेकअवे मॉडेलवर भर दिला. नंतर हळूहळू डायन-इन सुविधा सुरू करण्यात आली आणि व्यवसाय वाढत गेला.
1977 मध्ये PepsiCo ने Pizza Hut चे अधिग्रहण केले. त्यानंतर KFC आणि Taco Bell यांच्यासह हा ब्रँड कंपनीच्या मोठ्या फूड पोर्टफोलिओचा भाग बनला. पुढे 1997 मध्ये रेस्टॉरंट व्यवसाय वेगळा करण्यात आला आणि त्यातून Tricon Global Restaurants ची स्थापना झाली. याच कंपनीचे 2002 मध्ये Yum Brands असे नामकरण करण्यात आले.
त्यानंतर Pizza Hut ने जगभर विस्तार करत लाखो ग्राहकांना फास्ट फूड कल्चरची ओळख करून दिली. आज आईकडून घेतलेल्या काही हजार रुपयांच्या उधारीवर सुरू झालेला हा व्यवसाय हजारो कोटी रुपयांच्या डीलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे Pizza Hut ची कहाणी ही केवळ एका ब्रँडची यशोगाथा नसून, मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी कहाणी आहे.