

रोम : ‘पिझ्झा’ हा आज जगातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. एका साध्या पावापासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगात रूपांतरित झाला आहे. पिझ्झाची संकल्पना ही अत्यंत प्राचीन आहे. इजिप्शियन, ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये पीठाच्या चपट्या भाकर्यांवर (पाव) तेल, औषधी वनस्पती आणि खजूर लावून खाण्याची पद्धत होती.
प्राचीन ग्रीक लोक ‘प्लाकूस’ नावाचा पदार्थ खात असत, ज्यावर चीज, लसूण आणि कांदा असे घटक असायचे. सहाव्या शतकात पर्शियन सैनिक त्यांच्या ढालीवर फ्लॅटब्रेड म्हणजेच पाव भाजून त्यावर चीज आणि खजूर टाकून खात असत. आज आपण जो पिझ्झा पाहतो, त्याचे खरे श्रेय इटलीतील नेपल्स शहराला जाते. 18 व्या शतकात आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीला नेपल्स हे एक गजबजलेले बंदर होते. नेपल्समधील कष्टकरी कामगारांना स्वस्त आणि लवकर खाता येईल, अशा अन्नाची गरज होती. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेते फ्लॅटब्रेडवर टोमॅटो, लसूण, तेल आणि चीज घालून विकू लागले.
सुरुवातीला युरोपमध्ये टोमॅटोला विषारी मानले जात असे. मात्र, नेपल्समधील गरिबांनी जेव्हा याचा वापर पिझ्झावर करण्यास सुरुवात केली, तेव्हा पिझ्झाला आधुनिक चव मिळाली. पिझ्झाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना 1889 मध्ये घडली. इटलीचे राजा उमबेर्तो प्रथम आणि राणी मार्गेरिटा यांनी नेपल्सला भेट दिली. राणीला स्थानिक पदार्थ चाखायचा होता म्हणून प्रसिद्ध शेफ राफाल एस्पोसिटो यांनी त्यांच्यासाठी तीन प्रकारचे पिझ्झा बनवले.
राणीला तो पिझ्झा सर्वात जास्त आवडला ज्यामध्ये इटलीच्या ध्वजाचे तीन रंग होते : लाल (टोमॅटो), पांढरा (मोझारेला चीज) आणि हिरवा (तुळस किंवा बेसील). राणीच्या सन्मानार्थ या पिझ्झाला ‘पिझ्झा मार्गेरिटा’ असे नाव देण्यात आले. 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला इटालियन लोक मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्यासोबत पिझ्झाची कलाही नेली. 1905 मध्ये न्यूयॉर्कमध्ये ‘लोंबार्डीज’ हे अमेरिकेतील पहिले अधिकृत पिझ्झेरिया सुरू झाले.