Oracle Layoffs Pudhari
अर्थभान

Oracle Layoffs: ओरॅकलमध्ये मोठी कर्मचारी कपात; 30 हजार नोकऱ्या जाणार, कोणत्या विभागांवर परिणाम होणार?

Oracle Plans Massive Job Cuts Amid Push for AI Data Centres: जागतिक टेक कंपनी ओरॅकल जगभरात 20 ते 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

Rahul Shelke

Oracle Layoffs AI Restructuring: तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी ओरॅकल मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ओरॅकल जगभरात सुमारे 20 ते 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा सेंटर्स उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी CIO या संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गुंतवणूक बँक TD Cowen यांच्या संशोधन अहवालाचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. या नोकरकपातीमुळे ओरॅकलला 8 ते 10 अब्ज डॉलर्सपर्यंतचा ‘फ्री कॅश फ्लो’ मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांतील ओरॅकलची ही सर्वात मोठी नोकर कपात ठरू शकते. 2025 च्या अखेरीस कंपनीने आधीच सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तसेच, आरोग्यसेवा सॉफ्टवेअर कंपनी सेर्नर विकत घेतल्यानंतरही अनेक वेळा कर्मचारी कपात करण्यात आली होती.

कोणत्या विभागांवर परिणाम होणार?

या मोठ्या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका डेटा सेंटरशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कंपनीच्या मुख्य व्यवसायाबाहेरील (नॉन-कोर) युनिट्सना बसण्याची शक्यता आहे. AI इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनी कर्मचारी कपात करत असल्याचे सांगितले जात आहे.

याचा परिणाम ओरॅकलच्या ग्राहकांवरही होऊ शकतो. खर्च कमी करण्यासाठी कंपनी नवीन ग्राहकांकडून सेवांचे शुल्क थेट 40 टक्के जास्त घेण्यास सांगत असल्याची माहिती आहे. तसेच ‘ब्रिंग युवर ओन चिप’ (Bring Your Own Chip) मॉडेल लागू करण्याचा विचार सुरू असून, यामध्ये ग्राहकांना स्वतःचे हार्डवेअर पुरवावे लागणार आहे. या बदलांमुळे काही कंपन्यांनी इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे.

सर्नर विक्रीचाही विचार

खर्चात कपात करण्यासाठी ओरॅकल आपल्या आरोग्यसेवा सॉफ्टवेअर विभाग सर्नरच्या विक्रीचाही विचार करत असल्याची माहिती आहे. ओरॅकलने 2022 मध्ये सर्नर कंपनी 28.3 अब्ज डॉलर्सना विकत घेतली होती. मात्र आता वाढत्या आर्थिक दबावामुळे हा विभाग विकण्याचा विचार आहे.

TD Cowen च्या अहवालानुसार, ओरॅकलच्या AI आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर योजनांसाठी अंदाजे 156 अब्ज डॉलर्स इतका भांडवली खर्च अपेक्षित आहे. यामुळे कंपनीवर आर्थिक दबाव वाढला आहे.

क्लाऊड इन्फ्रासाठी मोठा निधी उभारण्याची तयारी

दरम्यान, ओरॅकलने 2026 मध्ये क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी 45 ते 50 अब्ज डॉलर्स उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनीचे भविष्य मोठ्या प्रमाणावर AI प्रकल्पांशी जोडले जात असून, त्यामध्ये OpenAI सोबतचे सहकार्यही महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र OpenAI अद्याप नफ्यात नसल्याने आणि भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर खर्चाबाबत माहिती नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात काही बाँडधारकांनी ओरॅकलविरोधात सामूहिक खटला दाखल केला होता. AI इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी अतिरिक्त कर्ज घेण्याची माहिती कंपनीने लपवून ठेवली, त्यामुळे आपले नुकसान झाले, असा त्यांचा आरोप आहे.

एकीकडे AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी, तर दुसरीकडे नोकरकपात, मालमत्ता विक्री आणि निधी उभारणीचे प्रयत्न, या सगळ्यांमुळे ओरॅकलमध्ये मोठे बदल होत आहेत. या निर्णयांचा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर, ग्राहकांवर आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT