Ration Card Update Pudhari
अर्थभान

Ration Card Update: रेशन कार्डचे नियम बदलले; आता कोणत्याही दुकानातून धान्य घेता येणार; रांगा आणि तुटवड्याचा त्रास संपणार

One Nation One Ration Card Update: केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेअंतर्गत रेशन वितरण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ration Card Update: देशभरातील रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सुलभ आणि डिजिटल बनवण्यासाठी सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (ONORC) योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे आता लाभार्थ्यांना केवळ एका रेशन दुकानावर अवलंबून राहावे लागणार नाही. ते आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकणार आहेत.

विशेष म्हणजे आता गहू आणि तांदूळ एकाच दुकानातून घेण्याची सक्ती नाही. जर एखाद्या दुकानात गहू उपलब्ध असेल आणि दुसऱ्या दुकानात तांदूळ उपलब्ध असेल, तर लाभार्थी दोन्ही ठिकाणांहून आपला हक्काचा रेशनचा हिस्सा घेऊ शकतील. त्यामुळे धान्याचा तुटवडा, लांबच लांब रांगा किंवा बायोमेट्रिक मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन न मिळण्याचा त्रास कमी होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना देशभरातील रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेमुळे रेशन कार्डधारकांना देशातील कोणत्याही राज्यात किंवा शहरात जाऊन आपल्या वाट्याचे धान्य मिळवणे शक्य होणार आहे.

ही सुविधा एटीएमसारखीच काम करते. जसे बँकेच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येतात, त्याचप्रमाणे लाभार्थी देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून आधार आणि बायोमेट्रिक पडताळणीद्वारे आपले धान्य घेऊ शकतात.

या योजनेचा सर्वाधिक फायदा स्थलांतरित कामगार, मजूर आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे. रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या नागरिकांना आता आपल्या मूळ गावातील रेशन दुकानावर अवलंबून राहावे लागणार नाही. ते जिथे राहतात, तिथेच आपले रेशन सहज मिळवू शकतील.

सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे रेशन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार असून लाखो लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT