म्युच्युअल फंड तारण ठेवताय? (Pudhari File Photo)
अर्थभान

Mutual Fund Loan | म्युच्युअल फंड तारण ठेवताय?

सामान्यतः जीवनात अशा काही वेळा येतात की, अचानक मोठ्या खर्चासाठी पैशांची गरज भासते.

पुढारी वृत्तसेवा

विधिषा देशपांडे

जर आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल आणि एक ठराविक निधी साठवला असेल, तर त्या फंडावर आधारित कर्ज घेणे हा एक सुरक्षित, सोपा आणि कमी व्याजदराचा पर्याय ठरू शकतो.

सामान्यतः जीवनात अशा काही वेळा येतात की, अचानक मोठ्या खर्चासाठी पैशांची गरज भासते. अशा वेळी पर्सनल लोन, गोल्ड लोन किंवा इतर कर्जप्रकार घ्यावे लागतात; पण त्यामध्ये प्रचंड व्याज, प्रोसेसिंग फी, कडक अटी आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. या सगळ्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडावर घेतले जाणारे कर्ज हे आर्थिक द़ृष्टिकोनातून अधिक फायदेशीर ठरते.

म्युच्युअल फंडावर कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड युनिटस् बँकेकडे किंवा गैर-बँकिंग वित्तीय संस्थेकडे तारण ठेवावे लागतात. या योजनेमध्ये फंड विक्री करण्याची गरज नसते, म्हणजेच गुंतवणूक सुरूच राहते आणि दरम्यान आवश्यक निधीही मिळतो. म्युच्युअल फंडावर मिळणार्‍या कर्जाचे व्याजदर हे साधारणतः 9 टक्क्यांपासून 11 टक्क्यांपर्यंत असतात, जे पर्सनल लोनच्या तुलनेत खूपच कमी आहेत. विशेषतः या प्रकारच्या कर्जावर प्री-क्लोजिंग पेनल्टीही लागत नाही, म्हणजेच आपण वेळेआधी कर्ज फेडले, तरी अतिरिक्तदंड भरावा लागत नाही.

कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना तुमच्या म्युच्युअल फंड युनिटस्ची एकूण किंमत, म्हणजेच नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू तपासतात. तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक केली आहे, त्याचा प्रकारही महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, डेट फंडावर 80 टक्क्यांपर्यंत आणि इक्विटी फंडावर 50 ते 70 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. समजा, तुमच्या म्युच्युअल फंडाची एकूण किंमत 5 लाख रुपये आहे, तर तुम्हाला 2.5 ते 4 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

हे कर्ज मिळवण्यासाठी तुमचे म्युच्युअल फंड युनिटस् डिमॅट स्वरूपात असणे आवश्यक असते. त्याशिवाय तुमचे आधार, पॅन आणि बँक खाते तपशील आवश्यक असतात. या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अनेक बँका आणि वित्तीय संस्था ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारतात. झेरोधा, ग्रो, पेटीएम मनी यासारखे फिनटेक प्लॅटफॉर्मसुद्धा ही सेवा देतात. त्याशिवाय आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, एसबीआय या प्रमुख बँकांकडेही ही सेवा उपलब्ध आहे.

कर्ज मिळाल्यानंतर तुम्ही ती रक्कम शिक्षण, व्यवसाय, आरोग्यसेवा किंवा घरगुती खर्च यांसह कोणत्याही वैध कारणासाठी वापरू शकता. यामध्ये कर्जाची परतफेड मासिक हप्ता स्वरूपात करता येते. विशेष बाब म्हणजे लोन घेतल्यावरही तुमच्या म्युच्युअल फंड युनिटस्मधून उत्पन्न मिळत राहते. म्हणजेच, तुमची मूळ गुंतवणूक सुरूच राहते आणि त्यावरचा नफा तुमच्याच खात्यात येत राहतो.

पण, यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर कर्ज वेळेवर फेडण्यात अयशस्वी ठरलात, तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमचे तारण ठेवलेले युनिटस् विक्री करू शकते. तसेच, बाजार घसरल्यास म्युच्युअल फंडाच्या युनिटस्ची किंमत कमी होऊ शकते आणि त्यामुळे संस्था तुमच्याकडून अतिरिक्तसुरक्षा रक्कम मागू शकते. म्हणूनच अशा कर्जाचा विचार करताना आपल्या आर्थिक स्थितीचा नीट विचार करणे गरजेचे आहे.

एकंदरीत पाहता, म्युच्युअल फंडावर आधारित कर्ज ही एक आर्थिकद़ृष्ट्या सुरक्षित पद्धत आहे. हे कर्ज कमी व्याजदरात, जलद आणि किमान कागदपत्रांत मिळते. शिवाय, यामध्ये फंड विक्री करण्याची गरज नसल्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. त्यामुळे जर तुमच्याकडे म्युच्युअल फंडाचा चांगला पोर्टफोलिओ तयार झाला असेल आणि तुम्हाला तात्पुरत्या आर्थिक गरजेसाठी निधी हवा असेल, तर म्युच्युअल फंडवर कर्ज घेणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT