Tech Layoffs 2026 Pudhari
अर्थभान

Tech Layoffs 2026: IT क्षेत्राचा सुवर्णकाळ संपला? 14 दिवसांत 25 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या; कारण काय?

Tech Layoffs 2026: जगभरातील टेक कंपन्यांचा AI आणि ऑटोमेशनकडे वाढता कल पाहता मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू आहे. अवघ्या 14 दिवसांत सुमारे 25 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

Tech Layoffs 2026: एकेकाळी स्थिर करिअर आणि भरघोस पगारासाठी ओळखल्या जाणाऱ्या IT क्षेत्रावर आता अनिश्चिततेचे ढग दाटताना दिसत आहेत. जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2026 च्या पहिल्या काही महिन्यांत हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या असून, केवळ मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांतच सुमारे 25 हजार टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, यामागे केवळ आर्थिक मंदी किंवा खर्च कपात हे कारण नाही. आता Artificial Intelligence (AI) हे नोकरकपातीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. अनेक कंपन्या मानवी कामगारांऐवजी ऑटोमेशन आणि AI वर भर देत असल्याने पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येताना दिसत आहे.

कोणत्या कंपन्यांनी केली नोकरकपात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, PayPal, Cisco, Cloudflare यांसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा PayPal ची होत आहे. कंपनी पुढील काही वर्षांत जवळपास 20 टक्के कर्मचारी संख्या कमी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम 4,700 हून अधिक कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो.

तसेच, Cisco नेही सुमारे 4 हजार नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा भर आता AI, क्लाउड आणि वेगाने वाढणाऱ्या टेक क्षेत्रांवर अधिक असणार आहे.

नोकरकपातीमागचं खरं कारण

पूर्वी कंपन्या आर्थिक तोटा, मंदी किंवा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करत असत. मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे. AI मुळे अनेक कामे अधिक वेगाने आणि कमी खर्चात होऊ लागल्याने कंपन्या “कमी लोक, जास्त काम” या मॉडेलकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे टेक कंपन्यांमध्ये सतत रीस्ट्रक्चरिंग सुरू आहे.

या बदलाचा फटका केवळ अमेरिकन कंपन्यांनाच बसत नाही. तर LinkedIn, Freshworks, Coinbase आणि Truecaller यांसारख्या कंपन्याही कर्मचारीसंख्या कमी करत आहेत. Freshworks ने जवळपास 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये वाढतेय भीतीचं वातावरण

सततच्या नोकरकपातीमुळे टेक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सोशल मीडिया आणि Reddit सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक कर्मचारी नोकरीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. AI मुळे भविष्यात आणखी नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र, काही तज्ज्ञ याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मते, AI माणसांची पूर्णपणे जागा घेणार नाही, पण AI सोबत काम करू शकणाऱ्या आणि सातत्याने नवीन कौशल्ये शिकणाऱ्या लोकांची मागणी वाढेल.

मग IT कर्मचाऱ्यांनी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात टेक क्षेत्रात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी टिकवण्यासाठी अपस्किलिंग (नवीन कौशल्ये शिकणे) आणि AI टूल्ससोबत काम करण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, पुढचा काळ हा वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि ऑटोमेशनचा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT