Iran US Israel Conflict Pudhari
अर्थभान

Iran US Israel Conflict: इराणचा गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडियासह अमेरिकन टेक कंपन्यांना इशारा; नेमकं काय घडतयं?

Iran US Israel Conflict: अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित बँका व आर्थिक केंद्रांवर हल्ला करण्याचा इशारा इराणने दिला आहे. युद्धाचा 12वा दिवस सुरू असताना तेहरानमध्ये जोरदार बॉम्बहल्ले झाले असून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

Rahul Shelke

Iran US Israel Conflict: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता १२ दिवस पूर्ण झाले असून या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या पार्श्वभूमीवर इराणने मोठा इशारा देत अमेरिकेशी आणि इस्रायलशी संबंधित टेक कंपन्या तसेच बँकांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेत सुरू असलेला तणाव आणखी वाढणार आहे.

इराणच्या खातम अल-अनबिया मुख्यालयाच्या (Khatam al-Anbiya Headquarters) प्रवक्त्याने हा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते हे मुख्यालय इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) संबंधित आहे. इराणमधील एका बँकेवर हल्ला झाल्यानंतर हा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवक्त्याने सांगितले की, “शत्रूंनी आमच्यावर हल्ला करून आमचे हात मोकळे केले आहेत. त्यामुळे आता आम्ही अमेरिकन आणि झायनिस्ट (इस्रायलशी संबंधित) संस्थांशी जोडलेल्या आर्थिक केंद्रांवर, टेक कंपन्यांवर आणि बँकांवर हल्ला करु शकतो.” या वक्तव्यामुळे मध्य-पूर्वेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच वेळी इराणकडून नागरिकांनाही इशारा देण्यात आला आहे. संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता लोकांनी अशा बँका, आर्थिक केंद्र किंवा कंपन्यांपासून किमान एक किलोमीटर अंतरावर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अल जझीराने वृत्त दिले आहे की, अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चालवले जाणारी कार्यालये आणि पायाभूत सुविधांची यादी खातम अल-अनबियाने प्रकाशित केली आहे. या यादीत गुगल, मायक्रोसॉफ्ट, पॅलांटिर टेक्नॉलॉजीज, आयबीएम, एनव्हीडिया आणि ओरॅकल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांची कार्यालये आहेत. या कंपन्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम लेबनॉनमध्येही दिसून आला. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काना (Qana) या शहरात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्येही परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बुधवारी रात्री झालेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे अनेक भागांत जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. या स्फोटांमुळे काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संघर्षामुळे केवळ मध्य-पूर्वच नव्हे तर संपूर्ण जगातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. जागतिक ऊर्जा बाजार, तेलाच्या किमती आणि व्यापार मार्गांवरही या युद्धाचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता वाढल्यास त्याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT