iPhone Duo Price in India: Appleच्या नव्या iPhone लॉन्चनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या मॉडेल्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू केवळ फीचर्स किंवा डिझाइन नसून iPhone Duo ची तब्बल 2.99 लाख रुपयांपासून सुरू होणारी किंमत आहे. फोनची किंमत समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या पैशांत मिळणाऱ्या इतर वस्तूंची तुलना सुरू केली आहे.
भारतामध्ये iPhone Duo ची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये, तर टॉप-एंड व्हेरिएंटसाठी 4,49,900 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे जवळपास तीन लाख रुपयांच्या किमतीत नेमकं काय-काय घेता येईल, याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
X यूजर प्रयाग (@theprayagtiwari) यांनी याच मुद्द्यावर पोस्ट करत iPhone Duo ऐवजी या पैशांत करता येणाऱ्या खर्चांची यादी शेअर केली. त्यांच्या मते, जवळपास तीन लाख रुपयांत नवी छोटी कार किंवा चांगली सेकंड-हँड कार, मोटारसायकल किंवा सुमारे 20 ग्रॅम सोने खरेदी करता येऊ शकते.
याशिवाय भारतातील अनेक शहरांमध्ये वर्षभराचे घरभाडे, कुटुंबातील लग्नातील जेवणाचा खर्च किंवा घरासाठी फ्रिज, एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि सोफा यांसारख्या वस्तूही घेता येऊ शकतात.
या पोस्टमध्ये आणखी एक मजेशीर पर्याय देण्यात आला आहे. तीन लाख रुपये एखाद्या महागड्या फोनवर खर्च करण्याऐवजी ते FDमध्ये गुंतवून त्यावर परतावा मिळवता येईल, असंही यूजरने म्हटलं आहे.
इतकंच नाही तर या रकमेत अनेक चांगले Android स्मार्टफोन खरेदी करता येतील किंवा त्याच पैशांत आई-वडिलांना एखाद्या छान सहलीवरही घेऊन जाता येईल, असा मुद्दा त्यांनी मांडला.
त्यामुळे पोस्टचा सूर असा होता की, एकीकडे तीन लाखांचा फोल्डेबल iPhone आणि दुसरीकडे कुटुंबासाठी उपयोगी ठरणाऱ्या अनेक गोष्टी, निवड नेमकी काय करायची?
या पोस्टवर X वर मोठी चर्चा रंगली. काही यूजर्सनी iPhone Duo ची किंमत खूपच जास्त असल्याचं म्हटलं, तर काहींनी वेगळाच मुद्दा मांडला.
एका यूजरच्या मते, तीन लाख रुपयांत कार, सोने किंवा सुट्टीचा खर्च करता येतो, ही तुलना योग्य असली तरी तीन लाखांचा iPhone खरेदी करणाऱ्या व्यक्तीने कदाचित आधीच कार घेतलेली असेल, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या असतील, गुंतवणूक केलेली असेल आणि स्वतःच्या गरजांनुसार खर्च करण्याची आर्थिक क्षमता त्याच्यात असेल. म्हणूनच अशा व्यक्तीसाठी तीन लाखांचा फोन ही मोठी गोष्ट नसेल, असा युक्तिवादही करण्यात आला.
iPhone Duo च्या किमतीवर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स आणि प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने तर थेट म्हटलं की, “आता iPhone ची स्पर्धा Samsungशी नाही, तर Royal Enfieldशी आहे.”
दुसऱ्या एका यूजरने टोला लगावत म्हटलं की, “जर तीन लाखांचा फोन घेण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची तुलना करावी लागत असेल, तर तुम्ही या फोनचे योग्य ग्राहकच नाही.”
तर काहींनी श्रीमंत ग्राहकांसाठी तीन लाख रुपये ही मोठी रक्कम नसल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीला हा फोन आवडला तर तो खरेदी करण्यापूर्वी फारसा विचार करणार नाही.
iPhone Duo ची किंमत आणि त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या पर्यायांची तुलना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तीन लाख रुपये स्मार्टफोनवर खर्च करायचे की त्यातून सोने, वाहन, घरातील वस्तू, प्रवास किंवा गुंतवणूक करायची, हा प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती आणि प्राधान्यांवर अवलंबून असलेला निर्णय आहे.
मात्र एक गोष्ट नक्की, तीन लाखांचा फोन बाजारात येताच त्याची तुलना आता केवळ दुसऱ्या स्मार्टफोनशी होत नाहीये; थेट कार, सोने आणि बाईकशी होत आहे!